breaking-newsक्रिडा

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा : सनसनाटी पुनरागमनासाठी सेरेना विल्यम्स सज्ज

पॅरिस – अव्वल महिला टेनिसपटू आणि विश्‍वविक्रमवीर सेरेना विल्यम्सने एका अपत्याची माता झाल्यानंतर फ्रेंच ओपन या पहिल्या ग्रॅंड स्लॅममध्ये सहभागी होताना सनसनाटी पुनरागमनाची तयारी केली आहे. तिच्या गैरहजेरीत गेल्या वर्षी ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या आणि यंदाच्या मोसमातील सर्व आव्हानवीर प्रतिस्पर्ध्यांना सेरेनाने धोक्‍याचा इशारा दिला आहे.
अर्थात वर्षभरानंतर खऱ्या अर्थाने स्पर्धात्मक टेनिस खेळण्यासाठी परतलेल्या सेरेनाची तंदुरुस्ती आणि तिची तयारी याबाबत शंका घेण्यात येत आहे. परंतु गेल्या वर्षी गर्भवती असतानाही ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या सेरेनाने आपल्या क्षमतेबद्दल शंका घेणाऱ्यांनाही तंबी दिली आहे. आपल्या कारकिर्दीत सातत्याने अग्रस्थानावर असलेल्या सेरेनाची गेल्या सप्टेंबरमध्ये कन्यारत्नाला जन्म दिल्यानंतर केवळ चार सामने खेळल्यामुळे विश्‍वक्रमवारीत 454 व्या क्रमांकावर घसरगुंडी झाली आहे.

परंतु मानांकनावर सेरेनाचा कधीच विश्‍वास नव्हता. आताही आपण केवळ टेनिसमध्ये परतण्यासाठी येत नसून जिंकण्यासाठीच पुनरागमन करीत आहोत, असे जाहीर करून सेरेना म्हणाली की, मी कधीच केवळ खेळण्यासाठी टेनिसच्या मैदानावर उतरत नाही. सेरेनाचा दीर्घकाळपासूनचा प्रशिक्षक पॅट्रिक मौराटोग्लू यानेही तिच्या क्षमतेबद्दल आत्मविलश्‍वास प्रकट केला आहे. मातृत्वामुळे सेरेनाच्या विजिगीषू वृत्तीवर कोणताही परिणाम झालेला नाही. तसेच पराभवाबद्दल तिच्या मनात तितकाच तिरस्कार आहे, अशी ग्वाही त्याने दिली.

सेरेना फ्रेंच ओपन स्पर्धेत केवळ जिंकण्यासाठीच खेळत असल्याचे सांगून पॅट्रिक म्हणाला की, सहा वर्षांहून अधिक काळ तिचा प्रशिक्षक म्हणून काम पाहिल्यानंतर मी सांगू शकतो की, सेरेनाने एकदा ठरविले, तर ती कोणतेही लक्ष्य निश्‍चितपणे साध्य करू शकते. गेल्या वर्षीची विजेती येलेना ऑस्टापेन्को आणि 15 महिन्यांच्या बंदीतून परतलेली मारिया शारापोव्हा यांच्यासह स्लोन स्टीफन्स आणि अमेरिकन ओपन विजेती कॅरोलिन वोझ्नियाकी या सेरेनाच्या अव्वल प्रतिस्पर्धी आहेत.

सेरेनाने तीन वेळा फ्रेंच ओपन जिंकली आहे. तिने 2002 मध्ये व्हीनसला अंतिम फेरीत नमवून पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर तब्बल 11 वर्षांनी 2013 मध्ये आणि 2015 मध्ये तिने क्‍ले-कोर्टवर वर्चस्व गाजविले. दरम्यान 2012 मध्ये तिला पहिल्याच फेरीत धक्‍कादायक पराभव पत्करावा लागला. तसेच 2014 मध्येही व्हर्जिनिया रेझानोने तिला दुसऱ्याच फेरीत चकित केले. परंतु या सगळ्यातून परतून तिने पुढच्याच वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली होती. अखेरच्या वेळी 2016 मध्ये सेरेनाला अंतिम फेरीत गार्बिन मुगुरुझाकडून पराभव पत्करावा लागला होता.

सेरेना-व्हीनसला “वाईल्ड कार्ड’ 
सेरेना आणि व्हीनस या विल्यम्स भगिनींच्या जोडीला फ्रेंच ओपन स्पर्धेतील महिला दुहेरीत वाईल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश देण्यात आला आहे. सेरेना व व्हीनस जोडीने याआधी 1999 आणि 2010 मध्ये विजेतेपद पटकावले होते. तसेच या जोडीने आतापर्यंत महिला दुहेरीत तब्बल 14 ग्रॅंड स्लॅम मुकुट जिंकले आहेत. मात्र फ्रेंच ओपनमधील गेल्या दोन सहभागांमध्ये या जोडीला 2013 मध्ये पहिल्याच पेरीत, तर 2016 मध्येै तिसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता. यंदाच्या वर्षी महिला एकेरीत सेरेनासमोर झेक प्रजासत्ताकाच्या क्रिस्टिना प्लिस्कोव्हाचे आव्हान आहे. तर व्हीनसला सलामीच्या फेरीत चीनच्या वांग क्‍वियांगशी लढत द्यावी लागेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button