फ्रेंच ओपन टेनिस : चेकिनाटोला नमवीत डॉमिनिक थिएम अंतिम फेरीत

- पहिल्यावहिल्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाची संधी
पॅरिस – ऑस्ट्रियाच्या सातव्या मानांकित डॉमिनिक थिएमने इटलीच्या मार्को चेकिनाटोची आश्चर्यकारक आगेकूच रोखताना येथे सुरू असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. चेकिनाटोने याआधी गॉफिन व जोकोविच या अव्वल खेळाडूंना पराभूत केले होते. परंतु थिएमने चेकिनाटोची झुंज 7-5, 7-6, 6-1 अशी संपुष्टात आणताना अंतिम फेरीत स्थान मिळविले.
त्याआधी थिएमने उपान्त्यपूर्व फेरीत द्वितीय मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हचा प्रतिकार तीन सेटमध्ये मोडून काढताना या स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी उपान्त्य फेरीत स्थान मिळविले होते. तसेच चौथ्या फेरीत जपानच्या 19व्या मानांकित केई निशिकोरीला पराभूत करताना थिएणने आशिया खंडाचे आव्हान संपुष्टात आणले होते. चेकिनाटोने माजी विजेत्या व विसाव्या मानांकित नोव्हाक जोकोविचची आगेकूच रोखताना सनसनाटी विजयासह उपान्त्य फेरी गाठली होती. तत्पूर्वी चेकिनाटोने उपउपान्त्यपूर्व फेरीत आठव्या मानांकित डेव्हिड गॉफिनला पराभूत केले होते. चेकिनाटोने याआधी कधीही ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत पहिल्या फेरीपलीकडे मजल मारलेली नाही.
थिएमसमोर येत्या रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत स्पेनचा अग्रमानांकित राफेल नदाल आणि अर्जेंटिनाचा पाचव्या मानांकित युआन मार्टिन डेल पोट्रो यांच्यतील विजयी खेळाडूचे आव्हान आहे. नदालने तब्बल अकराव्या वेळी पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत स्थान मिळविले असून त्यातील 10 वेळा या स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. राफेल नदालने अर्जेंटिनाच्या 11व्या मानांकित दिएगो सेबॅस्टियन श्वार्त्झमनचा 4-6, 6-3, 6-2, 6-2 असा पराभव करीत उपान्त्य फेरी गाठली असून डेल पोट्रोने तृतीय मानांकित मेरिन सिलिचवर 7-6, 5-7, 6-3, 7-5 अशी मात करताना उपान्त्य फेरीत धडक मारली.
नदालने या स्पर्धेत 2015 नंतर सलग 38 सामने जिंकले आहेत. आतो एकाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत 11 वेळा विजेतेपद पटकावणारा इतिहासातील पहिला खेळाडू ठरण्याची नदालला संधी आहे. विश्वविक्रमाचे दडपण जाणवते का, असे विचारल्यावर नदाल म्हणाला की, मी अखेर एक माणूसच असल्यामुळे दडपण येणे स्वाभाविकच आहे. डेल पोट्रोला गेल्या वर्षी अमेरिकन ओपनच्या उपान्त्य फेरीत नदालकडूनच पराभव पत्करावा लागला होता.