महाराष्ट्र

फ्रान्सच्या नव्या अध्यक्षांची अजब प्रेमकहाणी

लग्न कोणी कोणाशी करायचे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न असला, तरी थोरामोठ्यांच्या विवाहाची नेहमीच खमंग चर्चा होत असते. एखादा नेता सर्वोच्च पदावर पोचतो तेव्हा तर त्याचा जीवनपट मांडण्याची आपल्याकडे प्रथा. नेत्याचे वैयक्तिक जीवन कसे आहे, त्याची लाइफस्टाइल कशी, त्याची पत्नी कोण, मुले काय करतात, तो कोणत्या व्यवस्थेतून आला वगैरे वगैरे.

फ्रान्सचे नवनिर्वाचित आणि सर्वांत तरुण अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यामुळे त्यांची प्रेमकहाणी पुढे आली आहे. त्यांचे अध्यक्ष होण्याचे प्रसारमाध्यमांनी कौतुक केलेच; मात्र वयाने त्यांच्यापेक्षा तब्बल 24 वर्षांनी मोठ्या असलेल्या त्यांच्या पत्नीविषयीही अनेकांना आश्‍चर्य वाटले. एका पंधरा वर्षांच्या विद्यार्थ्याने आपल्याहून दुप्पट वयाच्या शिक्षिकेलाच लग्नाची मागणी घातली तर?

शिक्षिकेला धक्का बसेल की नाही? हा धक्का ब्रिगेटी ट्रॉगन्यूक्‍स या शिक्षिकेला बसला होता. प्रिय शिक्षिकेशिवाय आपण श्‍वासही घेऊ शकत नाही, ही भावना या इमॅन्युएल मॅक्रॉन या विद्यार्थ्याने आपल्या पालकांना सांगितली तेव्हा घरात भूकंपच झाला. मात्र, मॅक्रॉन यांनी या शिक्षिकेशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतला तेव्हा ते अल्पवयीन होते. पालकांनी त्याला धीर देताना सांगितले, की वर्ष- दोन वर्षे थांब. तो थांबलाही; पण शेवटी लग्न आपल्या प्रिय शिक्षिकेशीच केले.

खरे तर ब्रिगेटी आपल्या संसारात सुखी होत्या. पती, तीन मुलांसह संसार सुरू होता. संसारात न रमावं असं काही नव्हतं. ब्रिगेटी ज्या शाळेत शिकवत होत्या, त्याच शाळेत इमॅन्युएल शिकत होते. वयाच्या 15 व्या वर्षी ते प्रेमात पडले. त्या वेळी ब्रिगेटी यांची मुलगी लॉरेन्सही इमॅन्युएल यांच्या वर्गात होती. शाळेतील मुलांना वाटत होतं, की या दोघांमध्येच प्रेमप्रकरण सुरू आहे. पण, खरं गौडबंगाल दुसरंच होतं. लॉरेन्स नव्हे, तर तिची आई आवडते, असे त्यांनी एकदा आपल्या मित्रांना सांगितले आणि आपल्या प्रेमाची कबुली दिली. या दोघांचे प्रेम प्रकरण घरच्यांना समजलं, तेव्हा इमॅन्युएल यांना शाळेतून काढलं आणि पुढील शिक्षणासाठी त्यांची रवानगी पॅरिसच्या एका शाळेत केली. मात्र, त्यांचं प्रेम प्रकरण सुरूच होतं. पुढे इमॅन्युएलने लग्न करण्याची तयारी दाखविली, तेव्हा ब्रिगेटी यांनी पतीसोबतचा संसार मोडला आणि आपल्यापेक्षा निम्म्याहून कमी वयाच्या मुलासोबत दुसरी इनिंग सुरू केली.

विजयात पत्नीचा वाटा 
इमॅन्युएल यांच्या यशात पत्नी ब्रिगेटी यांच्यासह त्यांच्या पहिल्या पतीच्या तीन मुलांचाही सिंहाचा वाटा आहे. ब्रिगेटी या निवडणुकीच्या काळात त्यांच्या राजकीय सल्लागारच बनल्या होत्या. वडिलांना अजिंक्‍य ठरविण्यासाठी या दांपत्याच्या पाचही मुलांनी प्रचारात आघाडी घेतली होती. फ्रान्समध्ये झालेल्या निवडणुकीत इमॅन्युएल यांच्या वैवाहिक जीवनाविषयी मतदारांनी चर्चा न करता, हा तरुण देशाला पुढे नेऊ शकतो, असा विश्वास त्यांच्यावर व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button