फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो एकाच वेळी दोन महिलांशी लग्न करणार!

रिओ डी जानेरो : ब्राझीलचा दिग्गज फुटबॉल खेळाडू रोनाल्डिन्हो एकाच वेळी दोन महिलांशी विवाह करणार आहे. ब्राझीलच्या स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, रोनाल्डिन्हो या वर्षी ऑगस्टमध्ये प्रिस्किला कोएलो आणि ब्रिटीज सूजा या दोघींबरोबर एकाच वेळी लग्न करणार आहे.
या दोघी मागच्या वर्षापासून रिओ डी जानेरोमधील घरात रोनाल्डिन्होसोबतच राहत आहेत. 38 वर्षांच्या रोनाल्डिन्होने 2016 मध्ये ब्रिटीजला डेट करायला सुरुवात केली. तर प्रिस्किला आधीपासूनच त्याच्या आयुष्यात आहे.
प्रिस्किला आणि ब्रिटीज यांना रोनाल्डिन्होकडून 1500 पौंड भत्ताही मिळतो, जो त्या आपल्या इच्छेनुसार खर्च करु शकतात. त्याने दोघींना मागील वर्षी जानेवारी महिन्यात लग्नासाठी विचारले आणि साखरपुड्याची अंगठीही भेट दिली होती.
रिओ डी जानेरोमधील सांता मोनिका कोंडोमिनियममध्ये एका खासगी सोहळ्यात त्यांचं लग्न होणार आहे. मात्र रोनाल्डिन्होच्या या निर्णयावर त्याची बहिण नाराज आहे. दोन महिलांशी एकाच वेळी लग्न करण्याला तिचा विरोध आहे. त्यामुळे रोनाल्डिन्होच्या लग्नात सहभागी होण्यासही तिने नकार दिला. मात्र बहिणीच्या विरोधानंतरही रोनाल्डिन्होने दोघींसोबत लग्न करण्याचा निर्णय बदललेला नाही.
रोनाल्डिन्होची गणना जगातील दिग्गज फुटबॉलपटूंमध्ये होते. जगभरात त्याचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. ब्राझीलसाठी त्याने 97 सामने खेळले असून त्याच्या नावावर 33 गोलचा समावेश आहे. रोनाल्डिन्हो 2002 च्या विश्वचषकविजेत्या संघातील महत्त्वाचा सदस्य होता. तर 2003 मध्ये रोनाल्डिन्होने स्पेनच्या बार्सिलोना क्लबकशी करार केला. तो पाच वर्ष बार्सिलोनाकडून खेळला. यातील 145 सामन्यात त्याने 70 गोल केले आहेत. रोनाल्डिन्होची दोन वेळा फिफा वर्ल्ड प्लेअर ऑफ द ईअर म्हणून निवड झाली होती. तर बॅलोन डी’ओर हा पुरस्कारही त्याला मिळाला होता.