फिफा विश्वचषक फुटबॉल : पॅलेस्टिनींविरुद्ध तक्रार करण्याचा इस्राइलचा इशारा

- अर्जेंटिनाविरुद्धचा सराव सामना रद्द केल्यामुळे निषेध
पॅलेस्टिनी गटांनी केलेल्या तीव्र निदर्शनांनंतर इस्राइलविरुद्ध येत्या शनिवारी होणार असलेला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा सराव सामना रद्द करण्याचा निर्णय अर्जेंटिनाने घेतल्यामुळे इस्राइलने फिफाकडे पॅलेस्टिनींविरुद्ध तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. जेरुसलेम येथील टेडी कोलेक स्टेडियमवर अर्जेंटिना विरुद्ध इस्राइल हा सामना शनिवारी होणार होता. परंतु इस्राइलच्या निर्मितीसाठी झालेल्या युद्धात 1948 मध्ये उद्ध्वस्त झालेल्या पॅलेस्टिनी खेड्याच्या जागेवरच हे स्टेडियम उभारण्यात आले आहे. त्या युद्धात असंख्य पॅलेस्टिनी नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे पॅलेस्टिनी फुटबॉल संघटनेचे प्रमुख जिब्रिल राजौब यांनी हा सामना रद्द करण्याची विनंती अर्जेंटिनाला केली होती.
इतकेच नव्हे तर अरब फुटबॉलशौकिनांना निदर्शने करण्याचे आणि या सामन्यात सहभागी होणार असल्यास अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लियोनेल मेस्सीच्या प्रतिमा जाळण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. दरम्यान पॅलेस्टिनी फुटबॉल खेळाडूंवर इस्राइलने घातलेल्या निर्बंधांमुळे इस्राइलची हकालपट्टी करण्याची मागणी राजौब यांनी फिफाकडे केली होती. राजौब यांच्या आवाहानानुसार हजारो पॅलेस्टिनींनी बार्सिलोना येथे निदर्शने केली. या निदर्शकांनी अर्जेंटिनाची रक्तरंजित जर्सी फडकावीत धोक्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काही तासांच्या आतच अर्जेंटिनाने हा सामना रद्द केल्याची घोषणा केली.
अर्जेंटिनाचा कर्णधार गोन्झालो हिगुएन याने या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की, त्यांनी योग्य तोच निर्णय घेतला आहे. परंतु हे सारे प्रकरण आता मागे पडले असून विश्वचषक स्पर्धा हेच आमचे एकमेव लक्ष्य आहे. खेळाडूंची सुरक्षितता आणि कॉमन सेन्स या दोन्ही गोष्टींचा विचार केल्यास सामना रद्द करण्याशिवाय अन्य पर्यायही नव्हता, असेही हिगुएनने म्हटले आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अर्जेंटिनाचा ड गटांत समावेश असून त्यांची सलामीची लढत 16 जून रोजी आईसलॅंडविरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर 21 जून रोजी क्रोएशियाविरुद्ध, तसेच नायजेैरियाशी 26 जून रोजी अशा अर्जेंटिनाच्या अन्य लढती आहेत. इस्राइलविरुद्धचा सामना रद्द करण्यात आल्यानंतर अर्जेंटिनाचा संघ आणखी एखादा सराव सामना ठेवण्याची मागणी करणार, की थेट मॉस्कोत दाखल होऊन तेथेच सराव करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र इस्राइलविरुद्धची लढत रद्द केल्याबद्दल अर्जेंटिनाच्या बहुतांश खेळाडूंनी समाधान व्यक्त केले आहे.
इस्राइलच्या पंतप्रधानांचा हस्तक्षेप
अर्जेंटिनाने हा सामना रद्द करणे हा पॅलेस्टिनी समर्थक आणि इस्राइलविरोधी गटांचा विजय मानला जात आहे. त्यामुळेच अर्जेंटिनाने हा सामना रद्द केल्याची कोणतीही प्रतिक्रिया तत्काळ उमटली नसली, तरी इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष मॉरिशिओ मॅक्री यांना थेट दूरध्वनी करून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केल्याचे वृत्त आहे. परंतु या संदर्भात कोणतीही माहिती देण्यास अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने नकार दिला. इस्राइलचे समर्थन करणाऱ्या कोणत्याही देशाविरुद्ध निदर्शने करणाऱ्या गटानेही अर्जेंटिनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.