फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा!

नक्षल हल्ल्याचे पडसाद
शरद पवार, अशोक चव्हाण यांची मागणी
मुंबई : गडचिरोली जिल्ह्य़ातील नक्षलवाद्यांच्या भीषण हल्ल्याचा सर्व स्तरांतून निषेध होत आहे, मात्र त्याचबरोबर त्यावरून राजकारणही सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते आहे. त्यांनी त्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यात १६ जवान शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या भ्याड हल्ल्याची निंदा करावी तेवढी कमी आहे. नक्षलवादाच्या समस्येचा आम्ही येणाऱ्या काळात कठोरतेने मुकाबला करू, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
या हल्ल्याच्या घटनेचा शरद पवार यांनी निषेध केला. महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या कारवाया ही नित्याची बाब झाली आहे. राज्यकर्त्यांकडून नक्षलग्रस्त भागातील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे. गृह खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ज्यांना ‘जनाची नाही, तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही, सबब नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करणे व मृत्युमुखी पडलेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.
अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारच्या नक्षलवाद व दहशतवादाविरोधातील मवाळ भूमिकेचाच हा परिणाम असल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्रात गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकारही राहिलेला नाही. नक्षलवाद्यांनी एवढा मोठा हल्ला करेपर्यंत गृहविभाग काय करत होते, असा सवाल त्यांनी केला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत, त्यांनी तत्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे चव्हाण म्हणाले.
आठवले यांच्याकडून निषेध
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र निषेध केला. या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्यपालांकडून श्रद्धांजली
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी बुधवारी गडचिरोली जिल्ह्य़ात झालेल्या नक्षली हल्ल्यामध्ये वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे, तसेच या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. दरम्यान, या नक्षली हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्यपालांनी महाराष्ट्र दिनाच्या संध्येला राजभवन येथील चहापान व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत.