Mahaenews

प्लास्टिक, थर्माकोल संकलनावर जनजागृती

Share On

पिंपरी- महापालिका व पर्यावरण संवर्धन समितीने प्लास्टिक आणि थर्माकोलमुक्‍त शहर मोहीम हाती घेतले आहे. या मोहिमेला 19 एप्रिलपासून सुरुवात होणार असून 21 एप्रिल दरम्यान चालणा-या या मोहिमेत प्लास्टिक, थर्माकोल संकलनाबरोबरच जनजागृती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 अन्वये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल (पॉलिस्टायरिन) व प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल वस्तू उदाहरणार्थ ताट, कप्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे इत्यादी, हॉटेल्समध्ये अन्न पदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक भांडे व वाटी, स्ट्रॉ, नॉन वोवन पॉलिप्रॉपीलीन बॅग्ज, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच/कप, अन्नपदार्थ, धान्य साठविण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व प्लास्टिक वेष्टन या सर्व वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सजावटीसाठी देखील प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंदी घातली आहे. याविरोधात प्लास्टिक उत्पादन न्यायालयात गेले. मात्र, न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवत मुदत दिली आहे.

या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका आणि पर्यावरण संवर्धन समितीने प्रभागनिहाय मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार गुरुवारी (दि.19) सकाळी नऊ ते बारा दरम्यान ‘क’ आणि ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत भोसरी, मोशी, मासुळकर कॉलनी, नाशिक रोड भोसरी, दिघी रोड, लांडेवाडी बोपखेल, च-होली, मोशी या ठिकाणी प्लास्टिक व थर्माकोल कच-याचे संकलन केले जाणार आहे. शुक्रवार (दि. 20)   ‘अ, ‘ब’, ‘क’ व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भेळ चौक निगडी प्राधिकरण, एमआयडीसी चिंचवड, मोरवाडी कॉलनी, आनंदनगर चिंचवड, काळभोरनगर, लिंकरोड चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, चाफेकर चौक, रावेत, लोकमान्य टिळक चौक निगडी, कृष्णानगर चिखली, रुपीनगर, तळवडे येथे प्लास्टिक व थर्माकोल संकलन केले जाणार आहे. शनिवारी (दि. 21) ‘ड’, ‘ग’ व ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत औंध-रावेत रोड रहाटणी, रहाटणी रोड पिंपळे सौदागर, मनपा दवाखान्याजवळ पिंपळे गुरव, वाकड गावठाण, थेरगाव, डांगे चौक, काळेवाडी, कासारवाडी, संत तुकारामनगर, फुगेवाडी, दापोडी, सांगवी, नवी सांगवी येथे प्लास्टिक व थर्माकोल संकलन केले जाणार आहे.

पर्यावरण संवर्धन समितीने शहरातील नागरिकांना या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. तसेच दि. 19 ,20 आणि 21 एप्रिल 2018 रोजी प्रत्येकाने आपल्या कडे साठवून ठेवलेले चांगले अथवा खराब प्लास्टिक एकत्रित करून आपल्या घराच्या नजदीकच्या संकलन केंद्रावर आणून द्यावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. जे व्यापारी अथवा हातगाडीवाले पर्यावरण संवर्धनाच्या विचार प्रवाहांपासून दूर आहेत त्यांना जागृत करण्याबरोबर त्यांच्याकडील प्लास्टिक जमा करण्यासाठी स्वयंसेवक नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version