प्रेमसंबंधांना विरोध, तळेगावची तरुणी आई-वडिलांविरोधात हायकोर्टात

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील ऑनर किलिंगच्या घटनेने महाराष्ट्र हादरलेला असतानाच आई-वडिलांकडून जीविताला धोका असल्याचं सांगत एका 19 वर्षीय तरुणीने हायकोर्टात धाव घेतली आहे. आंतरजातीय प्रेमविवाहाला जन्मदात्या आई-वडिलांकडून धोका आहे, असा आरोप करत पुण्यातील प्रियंका शेटे या तरुणीने हायकोर्टात धाव घेतली. तरुणीची बाजू ऐकून घेऊन तिला सुरक्षा पुरवण्याचे निर्देश हायकोर्टाकडून तळेगाव पोलिसांना देण्यात आले आहेत.
पुण्यातील तळेगावजवळील नवलाख उंबरे या गावच्या 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने स्वतःच्या आणि प्रियकराच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय. प्रियंकाचा प्रियकर हा मातंग समाजाचा असल्याने तिच्या आई-वडिलांचा विरोध आहे. लग्न केल्यास माझ्या आणि प्रियकराच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं प्रियंकाने याचिकेत म्हटलंय. प्रियंकाने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचीही माहिती आहे.
प्रियकर गरीब कुटुंबातला असला तरी त्याच्यासोबत सुखी राहिन आणि कुणासोबत रहायचं याचा निर्णय घेण्याचा मला अधिकार आहे. मी सुज्ञ असल्याने हा अधिकार मला प्राप्त होतो. त्यामुळे आई-वडिलांपासून संरक्षण मिळावं आणि मुलभूत अधिकारांप्रमाणे जगण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
मी गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असल्याचं प्रियंकाने म्हटलंय. कुटुंबाला याबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी आम्हाला त्रास देणं सुरु केलं. मी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि पोलीस स्टेशन गाठलं. पण पोलिसांनीही मदत केली नाही, ज्यामुळे कोर्टात यावं लागलं, असं प्रियंका म्हणाली.