प्रियंका वाराणसीतून लढणार नसल्याने भाजपचाच तोटा

विरोध आघाडीतील मतविभागणी टाळण्यासाठी काँग्रेसची रणनीती
वाराणसीतून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांना उमेदवारी न देण्याच्या पक्षाच्या निर्णयावर भाजपने ‘पळपुटेपणा’ अशा शब्दात टीका केली असली तरी प्रियंका यांच्या ‘अनुपस्थिती’मुळे उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजपाचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आता प्रियंका यांच्यामुळे ‘प्रभावित’ होणाऱ्या भाजपाविरोधी मतांची विभागणी टळू शकेल, असे मानले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट वाराणसीतूनच आव्हान देण्यास उत्सुक असलेल्या प्रियंका यांना अखेर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि ‘यूपीए’च्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यामुळे माघार घ्यावी लागली. प्रियंका यांच्याऐवजी ‘बाहुबली’ अजय राय यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली. प्रियंका यांनी वाराणसीतून मोदी यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली असती तर पूर्वाचलमधील अलाहाबाद, फूलपूर, मिर्झापूर, गाझीपूर, गोरखपूर, फैझाबाद अशा अनेक मतदारसंघांत काँग्रेसला बळ मिळाले असते, असे गणित मांडले गेले होते. विशेषत: उच्चवर्णीय, दलित आणि मुस्लीम मते काँग्रेसच्या बाजूने ‘प्रभावित’ होऊ शकतील असा कयास होता.
प्रियंका यांना वाराणसीतून उमेदवारी नाकारण्यात आल्याने पक्षनेतृत्वानेच ‘माघार’ घेतल्याचा संदेश पूर्वाचलमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपर्यंतच नव्हे तर काँग्रेसच्या बाजूने वळू शकणाऱ्या मतदारांमध्येही गेला आहे. ही राजकीय स्थिती सप-बसप युतीसाठी अनुकूल ठरणारी आहे. प्रियंका यांच्या वाराणसीतील उमेदवारीमुळे सप-बसप युतीच्या मतांमध्ये विभागणी होऊन पूर्वाचलमध्ये भाजपाला मोठा फायदा मिळण्याची शक्यता होती.
वास्तविक, याच कारणामुळे सप-बसप युतीने प्रियंका यांच्या वाराणसीतील उमेदवारीची चर्चा सुरू होताच ‘सप’च्या शालिनी यादव यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर प्रियंका यांच्या उमेदवारीला विरोधी आघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता संपुष्टात आली होती. आघाडीच्या असहकारामुळेही प्रियंका यांना माघार घ्यावी लागल्याचे सांगितले जाते. ‘बसप’च्या सर्वेसर्वा मायावती यांनी मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेसला मते देऊ नका, असे आवाहन मतदारांना केले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आघाडीला ७३ जागा मिळाल्या होत्या; पण त्या वेळी उच्चवर्णीय नव्हे, तर दलित आणि मुस्लिमांनीही भाजपाला मतदान केले होते. या वेळी ही मते भाजपा मोठय़ा प्रमाणावर गमावू शकतो, ही बाब पश्चिम उत्तर प्रदेशमधील मतदानानंतर अधिक स्पष्ट होऊ लागल्याने आता भाजपाचा भर पूर्वाचलमधील मतदारसंघांवर असून काँग्रेसमुळे विरोधी आघाडीच्या अधिकाधिक मतांची विभागणी झाली तर भाजपाला फायदा मिळू शकतो. मात्र, प्रियंका वाराणसीत उमेदवार नसल्याने काँग्रेसची मतपरिवर्तनाची ताकद वाढण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे प्रियंका यांच्या वाराणसीतील अनुपस्थितीचा सप-बसप युतीला जास्त फायदा होण्याची शक्यता दिसू लागली आहे.
सप-बसपसाठी एक पाऊल मागे?
वारणसीतून नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लढण्याची प्रियंका यांची इच्छा होती, परंतु त्यांना पक्षाने नकार दिल्याने पक्षनेतृत्वानेच ‘माघार’ घेतल्याचा संदेश पूर्वाचलमधील काँग्रेस कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या बाजूने वळू शकणाऱ्या मतदारांमध्येही गेला आहे. ही राजकीय स्थिती सप-बसप युतीसाठी अनुकूल ठरणारी आहे. प्रियंका यांच्या वाराणसीतील उमेदवारीमुळे सप-बसप युतीच्या मतांमध्ये विभागणी होऊन पूर्वाचलमध्ये भाजपाला मोठा फायदा मिळण्याची शक्यता होती.