breaking-newsपुणे

प्रशस्त पदपथांमुळे वाहतुकीचा बोजवारा

  • लक्ष्मी रस्त्यावर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडी

लक्ष्मी रस्त्यासह शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पदपथांची रुंदी वाढवण्याचा घाट घालण्यात आला आणि प्रशस्त पदपथ तयार करण्यात आले. पदपथाची रुंदी वाढवल्यानंतर पहिल्याच दिवाळीत लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीचा बट्टय़ाबोळ झाला. बेशिस्त वाहतूक, अ‍ॅप आधारित मोटारी आणि मोठय़ा संख्येने आलेल्या वाहनांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. गेले आठवडाभर दिवाळी खरेदीसाठी लक्ष्मी रस्त्यावर गर्दी होत आहे. कोंडीमागे पदपथाची रुंदी कारणीभूत असल्याचा निष्कर्ष वाहतूक पोलिसांकडून नोंदवण्यात आला आहे.

पालिकेकडून काही महिन्यांपूर्वी शहरातील बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता तसेच जंगली महाराज रस्त्यावरील पदपथांची रुंदी वाढवण्यात आली. लक्ष्मी रस्ता हा शहरातील महत्त्वाचा रस्ता आहे. व्यापारी पेठेतील या रस्त्याची सुरुवात नाना पेठ भागातून होते. महापालिकेने लिंबराज महाराज चौक ते विजय चित्रपटगृह चौक दरम्यान पदपथाची रुंदी वाढवली. या भागात मोठय़ा संख्येने कपडय़ांची दुकाने आणि सराफी पेढय़ा आहेत. त्यामुळे हा भाग वर्षभर गजबजलेला असतो. दिवाळीत या भागात गर्दी होते. पुणे शहर परिसरातून अनेक जण सहकुटुंब लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी येतात. पदपथाची रुंदी वाढविण्यात आल्याने लक्ष्मी रस्ता आणखी अरुंद झाला असून, रुंदी वाढवल्यानंतर पहिल्याच दिवाळीत या भागात मोठी कोंडी झाली. पदपथ रुंदीकरणापूर्वी लक्ष्मी रस्त्यावर कोंडी व्हायची. पण रुंदी वाढविण्यात आल्यानंतर वाहनचालकांसाठी अवघा वीस फूट रस्ता वापरता येत आहे.

या बाबत विश्रामबाग वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज पाटील म्हणाले, लक्ष्मी रस्त्यावर वाढलेली पदपथाची रुंदी तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूला दुचाकी वाहने लावली जातात. त्यामुळे लक्ष्मी रस्ता अरुंद झाला आहे. लिंबराज महाराज चौक ते विजय चित्रपटगृह दरम्यान पदपथाची रुंदी वाढविण्यात आल्याने या भागात कोंडी होते. पुणे रेल्वे स्थानक भागातून कोथरूड, डेक्कनकडे जाणाऱ्या पीएमपी बस लक्ष्मी रस्त्याचा वापर करतात. पीएमपी बस तसेच मोठय़ा संख्येने वाहने रस्त्यावर आल्यानंतर सध्या या भागात मोठी कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांकडून कोंडी हटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. अ‍ॅप आधारित मोटारी या भागात प्रवासी घेऊन येतात. रस्त्यात या मोटारी थांबतात, तसेच रिक्षाचालक प्रवाशांना तेथे सोडतात. अशा वेळी या भागात कोंडी होते.

शहराच्या मध्य भागात शनिवारी आणि रविवारी खरेदीसाठी गर्दी होत असते. त्यामुळे आठवडय़ातून दोन दिवस वाहतूक पोलिसांच्या दृष्टीने कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर पडते, असे सहायक निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

एक किलोमीटरचे अंतर कापण्यास वीस मिनिटे

शिवाजी रस्त्यावरील लाल महाल चौक ते मंडईतील गोटीराम भैया चौक दरम्यानचे अंतर एक ते दीड किलोमीटर आहे. या भागात मोठी गर्दी होते. पीएमपी बस आणि मोठय़ा संख्येने वाहने रस्त्यावर आल्यानंतर एक किलोमीटरचे अंतर कापण्यास वाहनचालकांना दहा ते वीस मिनिटे लागतात.

पालिकेचे वाहनतळही अपुरे

सणासुदीच्या काळात शहरातील मध्य भागात खरेदीसाठी मोठी गर्दी होते. शहराच्या मध्य भागात मंडई, मिनव्‍‌र्हा चित्रपटगृह, नारायण पेठेतील हमालवाडा आणि भानुविलास चित्रपटगृहानजीक वाहनतळ आहे. तेथे मोटारी आणि दुचाकी लावण्याची सोय आहे. दिवाळीत महापालिकेचे वाहनतळ सकाळी अकरापूर्वीच पूर्णपणे भरतात. त्यामुळे या भागात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने लावण्यासाठी जागा शोधण्याची वेळ येते. अनेक जण जागा मिळेल तेथे वाहने लावतात. वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर जॅमरची कारवाई करण्यात येते. वाहतूक पोलिसांच्या दृष्टीने कोंडी सोडवणे महत्त्वाचे असते. कोंडी  सोडवण्याबरोबरच कारवाई करताना पोलिसांची पुरती दमछाक होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button