प्रभात रोडवर बिल्डरसह महिला वकिलावर जीवघेणा हल्ला

- जमिनीचा वाद : कार्यालयात घुसून दोघांनी कोयत्याने वार
- दोन्ही हल्लेखोर डेक्कन पोलिसांच्या ताब्यात
पुणे – जमिनीच्या वादातून डेक्कन येथील प्रभात रस्ता परिसरात असलेल्या बिल्डरच्या कार्यालयात घुसून दोघांनी कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला.
यात बिल्डर कृष्णा उर्फ बापू शेटे (वय 72) आणि ऍड. नेहा नितीन जाधव (वय 47) या वकील महिला जखमी झाल्या आहेत. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
अजित गणपत गोगावले (45, मांजरी हडपसर) आणि अमित अरुण वाल्हेकर (31,काळेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकऱणी नेहा जाधव यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेटे यांचे प्रभात रस्ता येथील बुट्टे पाटील क्लासिक इमारतीमध्ये कार्यालय आहे. दरम्यान त्यांचे आणि अजित गोगावले यांचे जमिनीच्या व्यवहारातून वाद होते.
या वादातून अजित गोगावले आणि त्याचा साथीदार अमित वाल्हेकर हे दोघे गुरूवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास त्यांच्या कार्यलयात गेले. त्यांनी शेटे यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर त्यांना सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या ऍड. नेहा जाधव या महिलेवरही कोयत्याने वार करत त्यांच्या हाताचे बोट तोडले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेटे आणि जाधव यांना रुग्णालयात दाखल केले. दोघा हल्लेखोरांना अटक केली. पुढील तपास डेक्कन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस.के.सोनवणे करत आहेत