प्रभाग समिती अध्यक्षपदावर भाजप नगरसेवकांच्या बिनविरोध निवडी, अपक्षासह शिवसेनेला डावलले

- आठही समितीच्या अध्यक्षपदावर भाजप नगरसेवकांची वर्णी
- भाजपकडून अपक्षासह शिवसेना नगरसेवकांना डावलले
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठही प्रभाग समिती अध्यक्ष पदावर भाजप नगरसेवकांची वर्णी लागली आहे. शनिवारी दुपारी 3 ते 5 यावेळेत भाजप नगरसेवकांचे प्रभागनिहाय आठ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आठही प्रभाग समिती अध्यक्षाच्या निवडी बिनविरोध होणार आहेत. निवडीची केवळ औपचारिका बाकी राहिली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती झाल्याने त्यांना संधी दिली जाईल, असे पालकमंत्री गिरीष बापट यांनी अनेकदा सांगितले होते. परंतू, प्रभाग समिती अध्यक्ष पद निवडीतून शिवसेनेला डावलेले यावेळी दिसून आले आहे.
भाजपकडून शर्मिला बाबर ( अ प्रभाग), करुणा चिंचवडे ( ब प्रभाग), यशोदा बोईनवाड ( क प्रभाग), शशिकांत कदम ( ड प्रभाग), सुवर्णा बुर्डे ( इ प्रभाग), योगिता नागरगोजे ( फ प्रभाग), अर्चना बारणे ( ग प्रभाग) आणि अंबरनाथ कांबळे ( ह प्रभाग) यांचे अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत.
9 मे रोजी महापालिकेतील मधुकरराव पवळे सभागृहात सकाळी 11:30 पासून प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी निवडणुकीला सुरुवात होईल. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची विभागीय आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होईल.
प्रत्येक प्रभाग समितीमध्ये भाजपचेच वर्चस्व आहे. त्याशिवाय, भाजपसमवेत अपक्ष आघाडी देखील आहे. भाजपकडून अपक्ष आघाडीच्या नगरसेवकांना देखील प्रभाग समिती अध्यक्ष पदामध्ये संधी दिलेली नाही. तसेच शिवसेनेला एक किंवा दोन प्रभाग समित्यांसाठी अध्यक्ष पद दिले जाईल, असे असताना याबाबत कोणताच निर्णय न झाल्याने शिवसेना नगरसेवकांना देखील डावलले आहे.