प्रत्येक बुरखाधारी महिला दहशतवादी नसते: रामदास आठवले

भारतातही बुरखा बंदी करा, अशी मागणी शिवसेनेने केली असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेविरोधात भूमिका घेतली आहे. प्रत्येक बुरखाधारी महिला दहशतवादी नसते, असे म्हणत रामदास आठवले यांनी शिवसेनेच्या मागणीचा विरोध दर्शवला आहे.
कोलंबोतील दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेत बुरखाबंदी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भारतातही बुरखाबंदी केली पाहिजे, अशी मागणी केली आहे. राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस आणि धैर्याचे दर्शन घडवले असून रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार?, असा सवाल शिवसेनेने विचारला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे.
“प्रत्येक बुरखाधारी महिला दहशतवादी नसते. जर एखादी महिला बुरखा घालून दहशतवादी कारवायांमध्ये सामील होत असेल तर तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण बुरखा ही मुसलमानांची परंपरा असून बुरखा घालणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे भारतात बुरखाबंदीची मागणी अयोग्य आहे”, रामदास आठवले यांनी सांगितले.
शिवसेनेचे म्हणणे काय?
बुरख्यांचा वापर करून देशद्रोह, दहशतवाद घडवला जात असल्याची उदाहरणे समोर आली. बुरख्याचा इस्लामशी काडीमात्र संबंध नाही व भारतातील मुसलमान अरबस्तानातील समाजव्यवस्थेचे अनुकरण करत आहेत. अरबस्तानातील वाळवंट व उन्हांच्या तप्त झळांपासून बचाव करण्यासाठी महिलांनी चेहरा झाकून बाहेर पडण्याची प्रथा कधीकाळी पडली. राज्यातही पारा चढतो त्यावेळी तरुणी चेहर्यास ओढणी किंवा रुमाल गुंडाळूनच बाहेर पडतात. हे तेवढ्यापुरतेच असते. मात्र ‘नकाब’ किंवा ‘बुरखा’ घालणे हा जणू कुराणाचा आदेश आहे अशा भ्रमात किंवा अंधश्रद्धेत येथील मुसलमान वावरत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.