प्रणव मुखर्जी स्वतःच्याच मुलीच्या निशाण्यावर

मुंबई : नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाऊन तुम्ही भाजपवाल्यांना खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याची संधी दिली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, असे म्हणत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर त्यांच्याच मुलीने निशाणा साधला आहे.
शर्मिष्ठा मुखर्जी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. या वृत्ताचं खंडन करत असा आपला कोणताही विचार नसल्याचे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी स्पष्ट केलं आहे. आजच्या घटनेतून तुम्ही काही तरी समजून घ्याल, अशी अपेक्षा करते. आरएसएसच्या कार्यक्रमात तुम्ही दिलेलं भाषण विसरलं जाईल, पण तिथली दृष्य उरतील आणि भविष्यात ते वापरले जातील, असं ट्वीट शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केलं.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या प्रणव मुखर्जींच्या स्वागतासाठी काँग्रेसकडून कुणीही उपस्थित नव्हतं. आरएसएसने आपल्या पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत केलं. नागपुरात आरएसएसच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला प्रणव मुखर्जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.