‘प्रगती एक्सप्रेस’ : मनमोहक रुपात प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल

पुणे – मुंबई – पुणे दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लाडक्या प्रगती एक्सप्रेसचे रुपडे पालटले आहे. ही गाडी रविवार (दि. ४) पासून नव्या मनमोहक रुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने ‘उत्कृष्ट’ या प्रकल्पांतर्गत प्रगती एक्सप्रेसच्या सर्व डब्यांमध्ये नावीण्यपुर्ण बदल केले आहेत. डब्यांच्या आत व बाहेर आकर्षक रंगसंगीत करण्यात आली आहे. त्यावर अॅन्टी ग्राफीटी कोटिंग असल्याने ते आकर्षक दिसण्याबरोबरच धुळीपासूनही त्याचे संरक्षण होणार आहे. डब्यातील मोकळ्या जागेमध्ये रेड कार्पेट टाकण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्राची संस्कृती आणि पर्यटन स्थळांची माहिती देणारे आकर्षक चित्रही रेखाटण्यात आली आहेत. वातावरण सुगंधी ठेवण्यासाठी मशीन्स लावण्यात आली आहेत. अंध प्रवाशांसाठी ब्रेल लिपीमध्ये बैठक क्रमांक लावण्यात आले आहेत. नवीन मोबाईल चार्जिंग सुविधा, आकर्षक पडदे, एलईडी लायटींग, डिजिटल घड्याळ, डिजिटल माहिती फलक, सामान ठेवण्यासाठी स्टीलचे रॅक अशा विविध सुविधा आहेत.