पोलिस चाैकीत धिंगाणा, 22 जणांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी – पोलिसांना वर्दी उतरवण्याची धमकी देत, पोलीस चौकीत धिंगाना घालणाऱ्या २२ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.७) रात्री अकराच्या सुमारास दापोडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाजवळ सार्वजनिक रस्त्यावर आणि पोलीस चौकीत घडली.
याप्रकरणी पोलीस हवालदार सुरेश मुंडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुशील अशोक चव्हाण (वय २८), शुभम अशोक चव्हाण (वय २३), कल्पना अशोक चव्हाण (वय ४०), कविता अशोक चव्हाण ऊर्फ जिनात हसीम शेख (वय ३२), किरण विशाल ननावरे (वय ३१), अशोक पाचू चव्हाण (वय ५४), ललिता अशोक चव्हाण (वय ४५) योगिता अशोक चव्हाण (सर्व रा. खडकी) जयेश विनोद चव्हाण (वय २२, रा. सांगवी), तेजस विनोद चव्हाण (वय १९, रा. सांगवी), दीपक महिपाल तुसाम (वय २३, रा. शिवाजीनगर), रोशन, अज्जू (पुर्ण नाव माहीती नाही, रा. संगमवाडी) आणि त्यांच्या सात ते आठ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.७) रात्री अकराच्या सुमारास पोलीस हवालदार सुरेश मुंडे यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून कॉल होता. यामुळे हवालदार मुंडे हे शिपाई म्हेत्रे आणि बिरारीस यांच्यासोबत जात होते. त्यावेळी दापोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाजवळ सुशील आणि शुभम यांचे भांडण सुरू होते. ते दोघे एकमेकांना बीअरची बाटली आणि दगडाने मारहाण करत होते. त्यामुळे त्या पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस चौकीत नेले. यावेळी आरोपींनी पोलीस चौकीजवळ बेकायदेशीर जमाव जमवला. तसेच पोलिसांना शिवीगाळ केली. आणि जातीवाचक बोलल्याची खोटी तक्रार करून वर्दी उतरवण्याची धमकी पोलिसांना दिली. याबाबत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तब्बल २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी सुशील आणि शुभम या दोघांना अटक करण्यात आली आहे.