पोलावरम धरणाच्या कामात केंद्राने हस्तक्षेप करावा – नवीन पटनाईक

भुवनेश्वर – आंध्रप्रदेशने पोलावरम येथे धरण बांधण्याचे काम सुरू केले आहे. या संबंधात ओडिशाचे काही आक्षेप आहेत. त्याची सोडवणूक केल्याशिवाय तेथील धरणाला अनुमती देऊ नये अशी मागणी ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यासाठी केंद्राने हस्तक्षेप करून तेथील धरणाचे बांधकाम थांबवावे अशी मागणी नवीन पटनाईक यांनी केली आहे.
वन आणि पर्यावरण खात्याचे मंत्री हर्षवर्धन यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की ओडिशाच्या नागरीकांच्या तक्रारींची दखल न घेता तेथील धरणाचे काम पुर्ण केले गेले तर त्याचा ओडिशातील हजारो लोकांना मोठा तडाखा बसणार आहे त्यामुळे केंद्राने यात त्वरीत हस्तक्षेप करून हे काम थांबवले पाहिजे अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे. या संबंधात आपण पंतप्रधानांनाही या आधी दोन पत्रे पाठवली आहेत पण त्याचा उपयोग झाला नाहीं असे त्यांनी आज पत्रकारांना सांगितले.
पोलावरम धरणाचे बांधकाम सुरू करणे हा गोदावरील पाणी लवादाच्या आदेशाचा भंग आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. आम्ही या संबंधात सन 2007 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यावरील सुनावणी प्रलंबीत आहे. त्यामुळे हा विषय सध्या न्यायप्रविष्टही आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.