पुण्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

पुणे – मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहेत. राज्यात काही ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असताना पुण्यात मात्र शांतता आहे.
यादरम्यान पुण्यात मंगळवारी खडकीमध्ये बंदला प्रतिसाद मिळत असून शहरात सर्व शांतता आहे. खडकी येथे आंदोलन करणाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्यास सांगितले. त्यानुसार त्यास प्रतिसाद देऊन दुकानदारांनी दुकाने बंद केली आहेत. अनुचित घटना घडु नये यासाठी पोलिसही कार्यरत आहेत.
शहरात आंदोलकांची मित्र मंडळ चौक ते डेक्कन येथील गरवारे पुलापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली होती. शास्त्री रस्ता, टिळक चौक, खंडुजीबाबा चौक, गरवारे पुल या रॅलीमार्गावर दुपारी एक पर्यंत काही मिनीटांसाठी रस्ता बंद करण्यात आला होता. त्यांनतर वाहतूक पुर्ववत झाली आहे. टिळक चौकाकडुन खंडुजीबाबा चौकाकडे जाणाऱ्या संभाजी पुलावरील वाहतूक नदी पात्रातील रस्त्याने वळविण्यात आली होती. उर्वरित शहरातील सर्व रस्त्यावरील वाहतुक सुरळीत आहे. कुठलेही रस्ते बंद नाहीत. वारजे, सिंहगड रस्ता परिसरात बंदचा परिणाम नाही.