पुण्यात जून अखेरपर्यंत पाणी कपात नाही – गिरीश बापट

पुणे – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा खालावला असला तरी जून अखेरपर्यंत कपात करण्यात येणार नसल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आढावा बैठकी नंतर जाहीर केले. मात्र प्रत्येक दहा दिवसांनी पाण्याचा आढावा घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री गिरिश बापट यांनी आज तातडीची बैठक बोलाविली होती. दुपारी साडेतीन वाजता महापालिका आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीस पाटबंधारे विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत 20 टक्के साठा शिल्लक असून हे पाणी जुलै 15 पर्यंत पुरेल याचे नियोजन करण्यात आले आहे.
मागली वर्षी हा साठा 8.20 टीएमसी होता तो या वर्षी 6 टीएमसी आहे.मात्र, पावसाळा लांबल्यास अडचण होण्याची शक्यता असल्याने पाटबंधारे विभागाने कपात वाढविण्याची मागणी केली आहे. त्यासाठी उद्या ( शनिवारी) ही बैठक होणार होती. मात्र, ती आज अचानक घेण्यात आली. यावेळी महापालिका आणि पाटबंधारे विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान शिल्लक साठा पुरेसा असून कपातीची गरज नसल्याचे बापट म्हणाले.