पुण्यात जलवाहिनी फुटली, मुलीच्या लग्नाचे दागिने गेले वाहून

पुण्यातील दांडेकर पूल येथे कालवा फुटण्याच्या घटनेला काही महिने झालेले असतानाच याच परिसरातील जनता वसाहतीमध्ये मध्यरात्री एका घराच्या खालून जाणारी जलवाहिनी अचानक फुटल्याने एका दुकानासह आठ घरांचे नुकसान झाले. यामध्ये संगीता भरत काशिद यांनी मुलीच्या लग्नासाठी तयार केलेले दागिने, पैसे आणि इतर साहित्य पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
या घटनेमुळे मुलीच्या लग्नासाठी तयार केलेले साहित्य पाण्यात वाहून गेले. संगीता भरत काशिद यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, जनता वसाहतीमध्ये मागील २५ वर्षापासून राहत असून आजवर कधी मी अशा स्वरूपाची घटना पहिली नाही. पण आज मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आमच्या घराच्या खालून गेलेली जलवाहिनी काही समजण्याच्या आत अचानक फुटली. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने जीव वाचविण्यासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण शक्य झाले नाही.
बाहेरुन लोकानी दरवाजा तोडल्याने बाहेर पडणे शक्य झाले. अन्यथा माझ्यासह पती, दोन मुली, एक मुलगा आणि भावाचं काही खरं नव्हतं. एका बाजूला जीव वाचला तर दुसर्या बाजूला माझे पती हमाली आणि मी भाजी विक्री करून एक एक पैसा जमवून उभा केलेला संसार डोळ्यासमोर वाहून जाताना पाहत राहिले. त्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नव्हता. कारण पाण्याचा प्रवाह प्रचंड होता. मात्र यामध्ये दोन महिन्यावर आलेल्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेले. साहित्य, दागिने देखील पाण्यात वाहून गेल्याने आता पुढे काय करायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही घटना सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
घरांना तडे गेले.
पुण्यातील जनता वसाहत मध्ये मध्यरात्री अचानक जलवाहिनी फुटल्याने आठ घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांना तडे देखील गेले आहे. यामध्ये तीन नागरिक जखमी देखील झाले आहेत.