पुण्याऐवजी ‘ते’ विमान थेट पोहचलं हैदराबादला?

पुणे : नवी दिल्लीहून निघालेले विमान पुण्याऐवजी थेट हैदराबादला पोहोचल्याची घटना घडली. विमानामध्ये पुरेसे इंधन नसल्याच्या कारणामुळे इंधन भरण्यासाठी विमान हैदराबादला जाणार असल्याची घोषणा विमानात करण्यात आल्याचा दावा प्रवासी करत आहेत, तर ट्रॅफिक कन्जेशनमुळे विमान हैदराबादला नेण्यात आल्याचे कंपनी प्रशासनाचे म्हणणे आहे.
जेट एअरवेजचे नवी दिल्ली-पुणे या विमानाने नवी दिल्ली येथून दुपारी सव्वा वाजता उड्डाण केले. हे विमान दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी लोहगाव विमानतळावर दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, हे विमान हैदराबाद मार्गे पुण्याला आणण्यात आल्याने नियोजित वेळेपेक्षा ५३ मिनिटे उशिराने, म्हणजेच चार वाजून १८ मिनिटांनी लोहगाव विमानतळावर लँड झाले. याबाबत एका प्रवाशाने सोशल मीडियावर पोस्ट करून संताप व्यक्त केला. विमानात इंधन कमी असल्यामुळे हे विमान पुण्याऐवजी हैदराबादला नेण्यात आले, असे प्रवाशाने म्हटले आहे. विमानात पुरेसे इंधन नसणे ही गंभीर बाब आहे. हा प्रकार म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ असल्याची टीका संबंधित प्रवाशाने केली आहे.