पुणे विमानतळावर एक कोटींचे सोने जप्त
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अबुधाबीवरून आलेल्या विमानातून महिलेकडून सिंथेटीक रबर पेस्टमध्ये लपवून तस्करी करून आणलेले ३ किलो ४१ किलो वजनाचे सोने सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले असून महिलेला अटक केली आहे. या सोन्याची आंतराराष्ट्रीय बाजारातील किंमत ९८ लाख ८३ हजार २५० रुपये आहे.
रेहाना फैजान अहमद खान (कुर्ला मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी पहाटे अबुधाबीवरून आलेल्या जेट एअरवेजच्या फ्लाईट क्रमांक ९ डब्लू-५१३ मधून रेहाना फैजान अहमद खान ही महिला उतरली. त्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तिची झडती घेण्यात आली त्यावेळी सिंथेटीक रबरची पेस्ट असलेल्या सहा पिशव्या पकडण्यात आल्या. त्या रबर पेस्टमध्ये ३०४१ वजनाचे सोने आढळून आले. त्यानंतर तिच्याकडून सोने जप्त करून अटक करण्यात आली. पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती पुणे विमानतळावरील सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त भारत नवले यांनी दिली.