पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर विचित्र अपघात

- सहा वाहनांचे नुकसान : खंडाळा घाटातील घटना
लोणावळा – पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात सहा वाहनांच्या विचित्र अपघातात दोन जण जखमी, अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काही विस्कळीत झाली होती. खोपोलीच्या हद्दीत शनिवारी (दि. 26) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातामध्ये चार मोटारी, एक कंटेनर व एका ट्रेलर अशा सहा वाहनांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईला पेंट घेऊन जाणाऱ्या ट्रेलरच्या (एच.आर. 55/ए.सी. 1817) चालकाचे येथील तीव्र उतार आणि वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रेलर पुढे जात असलेल्या मोटारीवर जोरात आदळला. त्यापुढे असणाऱ्या आणखी तीन मोटारी आणि एक कंटेनर एकमेकांवर जोरात आदळले. यामध्ये मोटारीमधील दोघे जखमी झाले आहेत. मात्र जखमींची नावे समजू शकली नाहीत.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील या अपघातात चार मोटारीसह ट्रेलरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काही विस्कळीत झाली होती. बोरघाट पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजुला केल्यानंतर ट्रेलरमधील मार्गावर सांडलेल्या पेंटवर माती टाकली. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. या प्रकरणी खोपोली पोलीस तपास करीत आहेत.