पुणे – दौंड-पुणे-दौंड प्रवाशांच्या मागणीला “हिरवी झेंडी’

- पहाटे 5.40 ला सुटणार पहिली डेमू : रेल्वे प्रशासनाचा निर्णय
- तीन महिन्यांच्या प्रायोगित तत्वावर बदल
पुणे – दौंड-पुणे-दौंड प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असून दौंड-पुणे दरम्यान पहाटे लवकर गाडी सोडण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन प्रशासनाने पुणे-दौंड धावणाऱ्या डूेमच्या वेळपत्रकात काही अंशी बदल केला असून दौंडवरून पहाटे 5.40 ला पुण्यासाठी डेमू सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, तीन महिन्यांच्या प्रायोगित तत्वावर हे बदल केले असून येत्या 11 जूनपासून दौंड ते पुणे दरम्यान गाडी नंबर 71407/71408 डेमू सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
काही दिवासांपूर्वी रेल्वे प्रशासनाने दौंड ते पुणे पहाटेची शटल अचानक बंद केली होती. तेव्हापासून पाटस, कडेठान, केडगाव, खुतबाव, यवत, उरुळी आन, लोणी आणि मांजरी याठिकाणावरून प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना अडचण येत होती. त्याचबरोबर सकाळी पुण्यात नोकरी, व्यवसायासाठी येणाऱ्या चाकरमाण्यांना याचा त्रास होत होता. यासाठी गेल्या काही दिवासांपासून दौंड ते पुणे पहाटे लवकर डेमू सोडण्यात यावी अशी मागणी दौंड-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करून अखेर पहाटे 5.40 ला दौंडवरून पुण्यासाठी डेमू सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी नंबर 71407 ही डेमू मध्यरात्री 3.15 ला पुण्यावरून दौंडकडे रवाना होऊन पहाट 5.10 ला दौंडला पोहोचेल तर गाडी नंबर 71408 ही पहाटे 5.40 मिनिटांनी दौंडवरून पुण्याकडे रवाना होऊन सकाळी 7.30 वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल. यामुळे सकाळी लवकर सुटणाऱ्या डेमुचा फायदा दैनंदिन पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेली व दौंड स्थानकावरून येणारी गाडी नंबर 51402 मनमाड-पुणे पॅसेंजरच्या वेळापत्रकात काही अंशी बदल केला आहे. ही गाडी दौंडवरून 5.40 ला सुटत होती मात्र नव्या वेळेनुसार ती 6.00 वाजता पुण्याच्या दिशेने सुटणार असून 8.30 वाजता पुणे स्थानकावर पोहोचणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.