पीच फिक्सींग प्रकरणी बीसीसीआयची भुमीका अस्पष्ट

नवी दिल्ली – भारत व श्रीलंका यांच्यात गॉल येथे गतवर्षी झालेल्या कसोटीच्या वेळी खेळपट्टीबाबत “फिक्सिंग’ करण्यात आल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला असून, याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्वरित चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र बीसीसीआयने या प्रकरणात सध्या तरी आपली भुमीका स्पष्ट केलेली नसून प्रतिक्षा करा आणि काय होते ते पहा अशी भुमिका घेतल्याचे दिसुन येते आहे.
हा सामना 26 ते 29 जुलै या कालावधीत भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान खेळल्या गेला होता. भारताने हा सामना 304 धावांनी जिंकला होता. पहिल्या डावात भारताने 600 धावा केल्या होत्या. त्यात शिखर धवनने 190 आणि चेतेश्वर पुजाराने 153 धावांचे योगदान दिले होते. भारताने दुसरा डाव 3 बाद 240 धावसंख्येवर घोषित केला होता. त्यात कर्णधार विराट कोहलीने नाबाद शतकी खेळी केली होती. श्रीलंकेचे दोन्ही डाव अनुक्रमे 291 व 245 धावांत संपुष्टात आले होते. हा सामना चार दिवसांमध्ये संपला होता.
प्रथम श्रेणीतील क्रिकेटपटू रॉबिन मॉरिसने खेळपट्टीबाबत झालेल्या “फिक्सिंग’मध्ये आपला हात असल्याची कबुली दिली आहे. खेळपट्टी तयार करणाऱ्यांच्या साहाय्याने हा प्रकार घडला असल्याचे त्याने म्हटले आहे. गॉल स्टेडियमचे सहायक व्यवस्थापक इंडिका थरंगा यांच्याकडे खेळपट्टी तयार करण्याची जबाबदारी होती. यावेळी इंडिकाने कथित दावा केला की, त्याने फलंदाजांना अनुकूल खेळपट्टी तयार केली होती. स्टिंग व्हिडिओमध्ये त्याने म्हटले की,”भारतीय संघ फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर खेळला. आम्ही खेळपट्टीला रोलरच्या माध्यमातून प्रेस केले आणि त्यावर पाणी टाकत टणक बनविले.’ इंडियन प्रीमिअर लीग खेळण्याचा अनुभव असलेल्या रॉबीन मॉरिसने अंडरकव्हर रिपोर्टरला कथित प्रकरणी म्हटले की, तो सट्टा लावण्यासाठी त्याला टीप्स देईल. यंदा नोव्हेंबरमध्ये इंग्लंडच्या श्रीलंका दौऱ्यातही या मैदानावर “पिच फिक्सिंग’ करण्यात येईल, असा दावाही त्याने यावेळी केली.
फिरकी किंवा द्रुतगती गोलंदाजीसाठी पोषक किंवा फलंदाजीस पोषक खेळपट्टी तयार केली जाऊ शकते. तुम्हाला कोणती खेळपट्टी हवी हे तुम्ही ठरवा व त्याप्रमाणे खेळपट्टी होईल, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यांनी पुढे म्हटले की, भारताला फलंदाजीस पोषक खेळपट्टी पाहिजे होती. त्यामुळे आम्ही खेळपट्टीवर रोलर फिरवला व त्यानंतर त्यावर पाणी घातल्यानंतर ती आणखी टणक झाली होती.
“आम्हाला यापूर्वीच ही माहिती कळली असून संबंधित देशांमधील भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीच्या सदस्यांमार्फत आम्ही सखोल चौकशी करीत आहोत. खेळपट्टी तयार करणाऱ्यांची चौकशी सुरू झाली असून सर्व पुरावे मिळवण्याचाही आम्ही प्रयत्न करीत आहोत,” असे आयसीसीच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीचे सरव्यवस्थापक ऍलेक्स मार्शल यांनी सांगितले