पीएमपीतील निलंबित कर्मचाऱ्यांना “अच्छे दिन’

- पुन्हा सेवेत घेण्यासाठी अजय चारठाणकरांच्या अध्यक्षतेखाली समिती
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) प्रशासनाने विविध प्रकरणात दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कारवाई केली होती. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक अधिकारी, कर्मचारी यांचे निलंबन केले होते. मात्र, मुंडे यांची बदली झाल्यानंतर काही महिन्यांतच प्रशासनाने निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांत काही अधिकाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यात आले असून नुकतेच आणखी 29 निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे पीएमपीने निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना “अच्छे दिन’ आल्याचे बोलले जात आहे.
पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक अधिकारी, कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. अनेक कर्मचाऱ्यांवर सातत्याने गैरहजर राहण्याबरोबरच आदी कारणांचा ठपका ठेवून त्यांना निलंबित केले होते. कामात गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवत प्रशासनातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील निलंबित करून त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, नुकतेच पीएमपी प्रशासनाने निर्णय घेऊन या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करून त्यांना सेवेत रुजू करून घेतले.त्यानुसार उर्वरीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील अशाप्रकारचा निर्णय घेण्यात येणार आहे. किरकोळ, मध्यम व गंभीर असे वर्गीकरण करून कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते. ज्या कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले असून ज्यांची चौकशी सुरू आहे अशांना बोलावून घेऊन याबाबत निर्णय घेतला जात आहे. यासाठी पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश होले, मुख्य अंतर्गत लेखा परिक्षक पंकज गिरी, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय माने, चौकशी अधिकारी सुभाष गायकवाड यांचा समावेश आहे. ही समिती निलंबित कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेत आहे. समितीची एक बैठक झाली असून त्यामध्ये विविध कारणास्तव निलंबित असलेल्या 62 पैकी 29 कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरीत कर्मचाऱ्यांबाबत देखील येत्या कालावधीत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
——————–
पीएमपीतील 90 कर्मचारी सेवानिवृत्त
पीएमपी प्रशासनतील विविध विभागात काम करणारे जवळपास 90 कर्मचारी 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे एकाचवेळी मोठ्याप्रमाणात मनुष्यबळ कमी झाले आहे. उर्वरीत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. त्याचबरोबर निलंबित कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन घरबसल्या दिले जाते. यामुळे प्रशासनाचा हा पैसा विनाकारण वाया जात असल्याने निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतल्यास फायद्याचे राहणार असल्याचे बोलले जात आहे.