पीएमपीचे स्पेअरपार्ट भंगारात?

पुणे – एका बाजूला नियमित देखभाल दुरूस्ती होत नसल्याने पीएमपी बसेसचे ब्रेकडाऊन, अपघात तसेच आग लागण्याच्या घटना वाढत असताना बसेसच्या देखभाल-दुरूस्तीसाठी आवश्यक साहित्य न घेता अनावश्यक साहित्य खरेदी करून लाखो रुपयांचे साहित्य भंगारात टाकले असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
पीएमपीचे हे साहित्य जाणून-बुजून भंगारात टाकण्यात आले असून नंतर तेच पुन्हा भंगार म्हणून विकून नव्याने रंगरंगोटी करून पुन्हा पीएमपीला विकले जात आहे. त्यामुळे या प्रकाराची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी तुपे यांनी पत्रकार परिषदेत केली.
तुपे म्हणाले, बस जळण्याच्या तसेच ब्रेकडाऊनच्या घटना गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत. या घटना बाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून गाडयांसाठी आवश्यक असलेले स्पेअर पार्ट नसल्याचे सांगत वारंवार खरेदी केली जाते. मात्र, दुसरीकडे अशा प्रकारे स्पेअर पार्ट स्वारगेट येथील इमारतीच्या गोडावून मध्ये अक्षरश: गंजलेल्या अवस्थेत असल्याचे तुपे यांनी पत्रकार परिषदेत निदर्शनास आणून दिले. तसेच महापालिका कितीही तूट आली, तरी संचलन तूट देणारच हे माहित असल्याने पीएमपीकडून अशा प्रकारे उधळपट्टी केली जात असल्याचे सत्ताधारी भाजपचे संचालक मंडळ त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही तुपे यांनी यावेळी केला. एका बाजूला सर्व सामान्य नागरिकांवर प्रत्येकवेळी दरवाढीची टांगती तलवार ठेऊन विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पासच्या किमती वाढविल्या जात असतानाच दुसऱ्या बाजूला ही उधळपट्टी योग्य नाही. त्यामुळे हे प्रकार तातडीने थांबविण्यात यावेत, अशी मागणीही तुपे यांनी यावेळी केली.