ताज्या घडामोडीपुणे

‘पीएमपी’ची बस खरेदी रखडली…

पुणे – पीएमपीच्या बसची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना 1550 बस घेण्याची प्रक्रिया रखडली आहे. या बाबत राजकीय सहमती झाली, तरी प्रक्रियेला वेळ लागत आहे. बस खरेदीसाठी दोन्ही महापालिकांनी काही निधी उपलब्ध करून द्यावा, अशी भूमिका पीएमपी प्रशासनाने घेतली आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात 1550 बस घेण्याची घोषणा महापालिका निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. पालकमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला होता. 120 बस पुणे, तर 80 बस पिंपरी- चिंचवड महापालिका स्थायी समितीमार्फत खरेदी करण्याची प्रक्रिया या पूर्वीच सुरू झाली आहे. नव्या बस जुलैपासून पीएमपीच्या ताफ्यात येतील, असे पीएमपी प्रशासनाचे म्हणणे आहे.

550 बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. त्यासाठी पीएमपी “एएसआरटीयू’शी करार करणार होती. परंतु कराराचा मसुदा तयार झाला असला, तरी गेल्या दोन महिन्यांपासून त्यावर शिक्‍कामोर्तब झाले नाही. 800 बस अल्प व्याजदरावर घेण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठीची प्रक्रिया महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सुरू केली होती. परंतु सध्या ही रखडली आहे. बस खरेदीसाठी काही प्रमाणात निधी दोन्ही महापालिकांकडून पीएमपीकडे यायला हवा, अशी भूमिका पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी घेतली आहे. त्याबाबत दोन्ही महापालिकांशी चर्चा करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे.

दुसरीकडे पीएमपीच्या सुमारे 1200 पैकी 768 बस रस्त्यावर आहेत. उर्वरित 432 बसपैकी 130 बसच्या इंजिनची कामे व्हायची आहेत. त्याला वेळ लागणार आहे. ठेकेदारांच्या 800 पैकी सुमारे 670 बस सध्या मार्गांवर धावत आहेत. त्यामुळे एकूण सुमारे 1450 बस सध्या मार्गांवर धावत आहेत. मुंढे यांनी पीएमपीची सूत्रे हाती घेतली तेव्हा 1350 बस मार्गावर धावत होत्या. त्यांनी नेटाने केलेल्या प्रयत्नांमुळे 1450 बस मार्गांवर धावू लागल्या आहेत, तर 1600 बस एक महिन्यात मार्गांवर आणण्याचे त्यांचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण झालेले नाही.

वाहक-चालकांची भरती अधांतरी 
बस संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांची संख्या कमी, प्रवासी कमी म्हणून उत्पन्न कमी आणि उत्पन्न कमी म्हणून पीएमपीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. नव्या बस येणार म्हणून पीएमपीची वाहक-चालकांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु नव्या बस केव्हा येणार, हे निश्‍चित नसल्यामुळे भरती प्रक्रिया “आस्ते कदम’ सुरू आहे, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button