पिंपळे सौदागर येथे चारचाकी वाहन जळून खाक

पिंपरी – पिंपळे सौदागर येथील बीआरटी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका चारचाकी (फोर्ड) वाहन अचानक पेट घेऊन जळुन खाक झाल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. येथील काटेपाटील चौकापुढील एका व्यायामशाळेच्या समोर चारचाकी वाहनाला आग लागल्याचे जीम मध्ये व्यायाम करीत असलेले नगरसेवक बापू काटे, प्रविण कुंजीर, प्रदीप घोडे, सुनिल शर्मा, प्रदीप खंडाळे यांच्या लक्षात आले.
सुरूवातीला नगरसेवक काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यायामशाळेतील आग विझविण्याच्या उपकरणांच्या सहायाने आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आग त्याला दाद देत नसल्याने त्यांनी ड प्रभाग व नेहरूनगर मधिल अग्निशामक दलाला कळविले. अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तात्काळ तेथे पोहचून ती आग अर्धातासात त्यांनी विझवली. यावेळी नगरसेवक काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने आजुबाजुची वाहने हटविली व सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतुक काही काळ बंद केली.
गाडी प्रमाणापेक्षा अधिक गरम झाल्याने अथवा आतील वायरींमध्ये पाऊसाचे पाणी गेल्याने शाँर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज सांगवी पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक अमित शेटे यांनी व्यक्त केला. सुदैवाने आगीची झळ गाडीच्या पाठीमागिल सीएनजी कीट पर्यंत न पोहचल्याने मोठा अनर्थ टळला.