ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी महापालिका आयुक्तांच्या लघुलेखकाला 12 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक

पिंपरी: एका बिल्डरला बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला देण्याकरिता त्याच्याकडून 12 लाखाची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या लघुलेखकास सोमवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या स्वच्छ व पारदर्शी कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

राजेंद्र सोपान शिर्के (वय-45 रा. संध्यानगरी जगताप डेअरी, पिंपळे-गुरव), असे लाच घेणा-या स्वीय सहाय्यक व लघुलेखकाचे नाव आहे. यासंदर्भात पिंपरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून  त्यांच्या थेरगाव येथील 11 इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यापैकी 7 इमारतींना महापालिकेकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला आहे. उर्वरित चार इमारतींचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देणे बाकी असून तो देण्यासाठी शिर्के यांनी त्या बांधकाम व्यावसायिकाकडून 12 लाख रुपयांची लाच मागितली होती.

दाखला आयुक्तांच्या सहीनंतर मिळणार असल्याने लाच देण्याचे तक्रारदाराने कबूल केले. तक्रारदार व्यावसायिकाने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि. 12 एप्रिल 2017 रोजी तक्रार दिली. त्यानुसार आज सोमवारी संध्याकाळी पिंपरी महापालिकेच्या पार्किंगमध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. शिर्के यांना 12 लाखांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. परंतु, तक्रारदार व्यावसायिकाने शिर्के यांना जाळ्यात ओढण्यासाठी 12 लाख रुपयातील केवळ दोन लाख रुपयांची रक्कम व उरलेले 10 लाखांचे केवळ कोरे कागद नेले होते.

याबाबत बोलताना आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, एसीबीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.

महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांची शनिवारी मंत्रालयात समाजकल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांची नियुक्ती झाली आहे. परंतु, त्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नाही. वाघमारे आपला पदभार नवीन आयुक्तांकडे सोपविण्याच्या तयारीत असतानाच लाचलुचपत खात्याने त्यांच्या स्वीय सहाय्यकास सोमवारी रंगेहात पकडले. त्यामुळे आता स्वीकारली गेलेली रक्कम नेमकी कोणाकडे जाणार होती, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिलीप बोरसटे, उपअधीक्षक सुनील यादव, पोलीस निरीक्षक अरुण घोडके, तपास अधिकारी उत्तरा जाधव यांच्या पथकाने केली.

दरम्यान, दि. 21 मार्च 2017 रोजी शाळांना अल्पोपहार आणि भोजन पुरविणा-या ठेकेदाराकडून 5 हजार रुपयांची लाच घेताना पिंपरीच्या शिक्षणाधिकारी अलका कांबळे व क्रीडा प्रबोधिनीचे मुख्याध्यापक बाबासाहेब अंबादास राठोड यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर फक्त  33 दिवसात महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या स्वीय सहाय्यकास 12 लाखांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडल्याने पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button