breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षांचे अपयश ; अन्‌ं अजित पवार यांच्या आदेशाला ‘मूठमाती’

  • राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे ढिसाळ ‘ब्रँडिंग’
  • जून महिनाअखेर अनेकांवर कारवाई होण्याची शक्यता

– विकास शिंदे

पिंपरी-चिंचवड म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला… मात्र, २०१४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर २०१७ मधील महापालिका निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचे आदेश पक्षाचे ‘कारभारी’ अजित पवार यांनी दिले होते. परंतू, कायम सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या स्थानिक पदाधिका-यांना जनतेला सोबत घेवून प्रभावी आंदोलन करुन पक्षाचा आवाज बुलंद करणे कधीच जमले नाही. नुकत्याच झालेल्या वर्धापन दिन कार्यक्रमात आणि त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांचा टक्का पाहता सुमारे ‘२५ हजार कार्यकर्ते घेवून कार्यक्रमाला या…’अशा ‘दादां’च्या आदेशाला अक्षरश : मूठमाती मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू,  तत्कालीन स्थानिक नेते माजी महापौर कै. भिकू वाघेरे यांचा राजकीय वारसा विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील चालवित आहेत. अत्यंत शांत आणि संयमी कार्यकर्ता अशीच त्यांची ओळख.  सत्तेत असलेल्या पक्षाचा शहराध्यक्ष शांत आणि संयमी असावा… असा एक मतप्रवाह आहे. मात्र, विरोधी पक्षातील शहराध्यक्ष हा आक्रमक आणि रस्त्यावर उतरुन सत्ताधाऱ्यांची कोंडी निर्माण करणाराच असला पाहिजे. कारण, त्याशिवाय पक्षाला उर्जा मिळणे अशक्य… असे पक्षश्रेष्ठींचे मत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेताना अनेकदा संजोग वाघेरे यांना कसरत करावी लागत आहे.

आठ-दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीनही विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. त्यामध्ये पक्षसंघटन मजबूत करा, निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय द्या, वन बूथ – २५ यूथ अशी संकल्पना प्रभावीपणे राबवा, तळागाळातील कार्यकर्त्याला संधी द्या, आदी अनेक सूचना करण्यात आल्या. विशेष म्हणजे, पुण्यात होणा-या वर्धापन दिन आणि पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलन समारोप समारंभाला पिंपरी-चिंचवडमधून किमान २५ हजार कार्यकर्त्यांना घेवून पुण्यात दाखल व्‍हा, वर्धापन दिनाचे चांगले ‘ब्रँडिंग’ करा, असे आदेशच अजित पवार यांनी दिले होते. मात्र, दादांच्या आदेशाला नेहमीप्रमाणे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हरताळ फासला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त एकही फ्लेक्स झळकला नाही. कार्यकर्त्याची वज्रमूठ बांधण्यात अपशय आले. सुमारे २० हजार राष्ट्रवादीप्रेमी पुण्यातील सभेला जातील, अशी अपेक्षा असताना अवघे एक हजार-पंधराशे कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यातच पावसाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे काहींनी अर्धा कार्यक्रम झाल्यावरच काढता पाय घेतला.

दुसरीकडे, भोसरीतून माजी आमदार विलास लांडे, चिंचवडमधून ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे आणि पिंपरीतून शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पुढकार घेणे अपेक्षीत होते. मात्र, तसे झालेले नाही. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्ताचे प्रभावी ‘ब्रँडिंग’ करणे तिघांनाही जमले नाही. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा भ्रमनिरास होवून कार्यक्रमाला उपस्थित राहिलाच नाही. या अपयशाचे खापर आता शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यावर फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून महिनाअखेर पक्ष संघटनेत काही बदल होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे.

दरम्यान, माजी आमदार विलास लांडे आणि शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी ‘फेसबूक लाईव्‍ह’ च्या माध्यमातून कार्यक्रमाची तयारी करण्याचा प्रयत्न केला. ‘फेसबूक लाईव्‍ह’ द्वारे कार्यक्रमाला उपस्थित रहा…असे आवाहन करणे योग्य झाले असते. पण, या लाईव्‍ह कार्यक्रमात पक्षाच्या वाटचालीबाबत किंवा विचारधारेबाबत बोलणे अपेक्षीत होते. तसे झाले नाही. पुन्हा त्याच-त्या गोष्टींवर टीका करीत ‘फेसबूक लाईव्‍ह’ उपक्रमही फेल करण्यात आला. त्याऐवजी कार्यक्रमाला जाण्याची व्यवस्था काय? पार्किंग व्यवस्था कुठे आहे? कार्यकर्त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था काय आहे? पुण्यात आपण एकत्र कुठे भेटणार..त्याद्वारे पिंपरी-चिंचवडकरांचे शक्तीप्रदर्शन कसे करणार? आदी विषयांवर ‘फेसबूक लाईव्‍ह’ सविस्तर चर्चा व्‍हायला पाहिजे होती, असेही काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

शहरातील एकूण ३२ प्रभागातील सर्व आजी-माजी नगसेवकांना आमंत्रित करण्याची अपेक्षीत होते. तसेच, गतवेळी महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांना पक्षासोबत बांधून ठेवण्याची गरज आहे. पराभूत झालेल्या उमेदवारांना शहराध्यक्षांचा साधा ‘एसएमएस’ही आला नाही, अशी चर्चा आहे. युवक शाखा, विद्यार्थी शाखा, महिला आघाडी, युवती आघाडी यांसह अन्य अनेक सेलच्या प्रमुखांची बैठक घेवून त्यांना राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे अपेक्षीत आहे. मात्र, पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर विद्यमान शहराध्यक्ष अपयशी ठरले आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

वाढदिवसाला शहरभर झळकणारे कुठे गेले ?

भोसरी आणि चिंचवडमध्ये पक्षाच्या दोन पदाधिका-यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. त्यावेळी चिंचवड आणि भोसरीमध्ये बेसुमार फ्लेक्सबाजी झाली होती. मात्र, पक्षाच्या वर्धापन दिनाला सर्वांनीच हात आखडता घेतला. मी का खर्च करु… अशी भूमिका प्रमुख नेत्यांची घेतली. राष्ट्रवादी पक्षाचे महापालिकेत तब्बल ३६ नगरसेवक आहेत. प्रमुख पदाधिकारी आणि सर्व शाखांचे असे सुमारे १५० प्रमुख पदाधिकारी आहेत. तरीही राष्ट्रवादीचा वर्धापन दिन शहरात सुनासुना झाला. हाताच्या बोटावर मोजता येतील, असे काही छोटे फ्लेक्स काही ठिकाणी आपले अस्थित्त्व दाखवत होते. एऱ्हवी स्वत:चे ‘ब्रँडिंग’ करण्यात व्यस्त असलेले नेते पक्षाबाबत उदासीन भूमिका घेतात. त्यामुळे विद्यमान शहराध्यक्षांनी सर्वांना सोबत घेवून पक्षाची विचारधारा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. अन्यथा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतसुद्धा पक्षाची स्थिती विदारक होईल, यात शंका तिळमात्र नाही.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button