breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील ‘अर्जुन- द्रोणाचार्य’ ‘महायुती’मुळे आमदार महेश लांडगे यांचा ‘अभिमन्यू’ ?

  • आमदार जगताप, माजी आमदार लांडे यांचे ‘गळ्यात गळे’
  • आमदार महेश लांडगे यांच्या राजकीय कोंडीचा ‘ हुकमी डाव’

पिंपरी। (विकास शिंदे) – पिंपरी-चिंचवडमधील राजकारणातील ‘गब्बर’ नेते भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीतील राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचे संबंध ‘अर्जुन- द्रोणाचार्य’ यांच्या इतकेच दृढ आहेत. याला स्वत: आमदार जगताप यांनी दुजोरा दिला. त्यामुळे लांडे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि भाजपचे सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांचा पिंपरी-चिंचवडच्या राजकीय महाभारतात ‘अभिमन्यू’ होणार, अशी चर्चा रंगली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीतील राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांची मैत्री शहराला सर्वश्रुत आहे. पण, महापालिका निवडणुकीत ‘राम-लक्ष्मण’च्या जोडीने एकोप्याने भाजपचे ‘कमळ’ फुलवले. सुमारे वर्षभर राज्य एकदिलाने चालवले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ‘राम-लक्ष्मण’च्या जोडीत दुरावा वाढताना दिसत आहे. महापालिकेतील पद वाटप, विकास कामे आणि मानपानाच्या मुद्यावरुन खटके उडताना दिसत आहेत. मात्र, आजपर्यंत दोघांपैकी कुणीही याबाबत जाहीरपणे वाच्यता केलेली नाही.

काही दिवसांपूर्वी वाकड येथील भूमीपूजनाच्या कार्यक्रमात चिंचवड विधानसभेचे आमदार असतानाही आमदार लक्ष्मण जगताप यांना डावलण्यात आले. जगताप यांचे विधान सभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आणि शिवसेना महापालिका गटनेते राहुल कलाटे यांनी स्थानिक पातळीवर कार्यक्रम उरकून घेतला. या कार्यक्रमाला आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक महापौर नितीन काळजे यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे नाराज झालेल्या आमदार जगताप यांनी महापौर काळजे यांना खडेबोल सुनावले होते. त्यामुळे आमदार जगताप-लांडगे यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी शहरातील चिंचवड विधानसभेत आमदार लांडगे यांनी आणि भोसरी विधानसभेत आमदार जगताप यांनी लक्ष घालायचे नाही, असा अलिखित करार झाला होता. मात्र, चिंचवडमधील प्रतिस्पर्धी कलाटे यांच्या प्रभागातील भूमिपूजन कार्यक्रमात हेतुपुरस्सर अंधारात ठेवले, निमंत्रण प्रत्रिका वेळेत दिली नाही. त्यावर महापौर काळजे यांच्याहस्ते भूमिपूजन उरकून घेतले, त्यामुळे जगताप यांची नाराजी वाढली आहे, असा राजकीय अर्थ काढला जात आहे.

दरम्यान, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शुक्रवारी दिमाखात वाढदिवस साजरा केला. संपूर्ण शहरभर आमदारांचे आमदार…आमचे आमदार तुम्हीच…पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा बाप माणूस…बीग बॉस…शेठ, भोसरीचा विकास आम्हीच करणार…अशा प्रकारे होर्डिंगद्वारे ‘ब्रँडिंग’ करण्यात आले. पण, त्यापुढे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत विलास लांडे यांचा गौरव समारंभ झाला. यावेळी दोन्ही नेत्यांनी आपल्या अभेद्य मैत्रीचे गुणगान गायले. तसेच, लांडे हे माझ्यासाठी गुरूस्थानी अर्थात द्रोणाचार्य आहेत, असे गौरोद्गार आमदार जगताप यांनी काढले. त्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचाव­ल्या आहेत. जगताप आणि लांडे यांनी एकत्रितपणे आमदार लांडगे यांच्याविरोधात रणशिंग फुंकले, तर ‘राम-लक्ष्मण’ जोडीचे ‘रामायण’ संपणार आहे. त्यानंतर ‘अर्जुन-द्रोणाचार्य’ यांचे राजकीय ‘महाभारत’ सुरू होईल. विशेष म्हणजे, अर्जुन-द्रोणाचार्य अर्थात जगताप-लांडे यांच्या ‘महायुती’मुळे आमदार लांडगे यांचा राजकीय ‘अभिमन्यू’ होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आगामी काळात ‘राम-लक्ष्मण’ जोडी अभेद्य राहणार की, ‘द्रोणाचार्य-अर्जुन’ गुरु-शिष्याचे नवीन राजकीय ‘महाभारत’ पहायला मिळणार? की जगताप, लांडे आणि लांडगे यांच्यापैकी एकाचा ‘अभिमन्यू’ होणार? याबाबत केवळ तर्कवितर्क लढवले जात आहेत. कारण, राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शूत्र अथवा मित्र राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

काय म्हणाले आमदार लक्ष्मण जगताप?

विलासराव माझे गुरु आहेत, भोसरी हे माझे विद्यापीठ असून विलासराव राजकारणातील कुलगुरु आहेत, आमचे गुरू द्रोणाचार्य विलासरावांनी अद्याप माझ्याकडे अंगठा मागितला नाही. कारण, अजून अख्खा हात शिल्लक आहे. त्यांच्यासाठी कायम साथ देणार आहे, असे सूचक वक्तव्य आमदार जगताप यांनी भोसरीतील गौरव समारंभात केले आहे.

काय म्हणाले माजी आमदार विलास लांडे?

राजकारणात जास्त काळ कधी कुणाचा शत्रू राहात नसतो. विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपात गेलो असतो, तर खर्च न करता आमदार झालो असतो. परंतू, पक्षासह नेत्यांवर निष्ठा ठेवत इथंच राहिलो. या शिवाय लक्ष्मण जगतापांशी मैत्रीच्या पलिकडंचे तीन पिंढ्याचे नाते आहे. ते यापुढेही कायम राहणार आहे, अशा भावना माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button