breaking-newsपुणे

पावसाळ्याच्या तोंडावर एसटी बसेसची डागडूजी

  • पुणे विभागातील 13 डेपोंना सूचना : बसेस गळणे, बंद पडण्याचे प्रमाण अधिक

पुणे – राज्यातील विविध भागांत विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी राज्य परिवहनच्या (एसटी) बसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पावसाळ्याच्या काळात राज्य परिवहनच्या (एसटी) बसेस गळणे, बंद पडण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर पुणे विभागातील एसटी बसेसच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून विभागांतर्गत येणाऱ्या 13 डेपोंना सूचना देण्यात आल्या आहेत. डेपोतील नादुरुस्त बसेस तत्काळ दुरुस्त करून घेण्याचे सांगण्यात आले असून यासंदर्भाचा आढावा पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे विभागांतर्गत एकूण 13 डेपो येत असून सद्यस्थितीत रस्त्यावर धावणाऱ्या एकूण बसेसची संख्या 1 हजार 19 इतकी आहे. एसटी बसेसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेषतः लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी एसटीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पुण्यातून राज्यातील सर्व भागांत जाण्या-येण्यासाठी एसटी बसेसची सोय आहे. या ठिकाणावरून रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या पाहाता सर्व गाड्या फुल भरून जातात. एप्रिल-मे या सुट्ट्यांच्या कालावधीत तर एसटी वाहतुकीवर मोठा ताण पडतो. दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटी बसेसची वेळेवर दुरुस्ती होणे गरजेचे असते. त्यानुसार प्रशासनाकडून ती केली जाते. मात्र, एसटीच्या ताफ्यातील बऱ्याचशा गाड्या या जुन्या असून पावसाळ्याच्या काळात अशा गाड्यांचा त्रास लोकांना सहन करावा लागतो. पावसाळ्यात गाड्या बंद पडणे, पाणी गळणे, तुटलेल्या खिडक्‍या, काचांमधून आत पाणी येणे अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. याकाळात गाड्या बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ होते. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासनाकडून एसटीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तशा सूचना पुणे विभागांतर्गत येणाऱ्या 13 डेपो मॅनेजरला देण्यात आल्या आहेत. यांतर्गत गाड्यांची तपासणी करून डागडूजी करण्यात येत आहे. ज्या गाड्यांना पुढील काचेवर वायपर नाही त्यांना वायफर बसवणे, जुने टायर असल्यास ते बदलणे, लायटींग, वायरींग, नादुरुस्त दरवाजे आदी कामे हाती घेण्यात आले आहेत. यासंदर्भात आढावा घेऊन पावसाळ्यापूर्वी सर्व गाड्यांची दुरुस्ती केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
———————-

ुपावसाळ्याच्या तोंडावर पुणे विभागातील एसटी बसेसच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी विभागांतर्गत येणाऱ्या 13 डेपोंना सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार गाड्यांची तपासणी करून त्याची डागडूजी करण्याचे सांगण्यात आले आहे; तर यासंदर्भात पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.
– रवींद्र मोरे, प्रभारी विभाग नियंत्रक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button