पावसाळी अधिवेशन नागपूरातच

- निर्णयावर शिक्कामोर्तब : 4 जुलैपासून होणार सुरूवात
मुंबई – शिवसेनेचा विरोध असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या शिफारशीनंतर पावसाळी अधिवेशन 4 जुलैपासून नागपूर येथे सुरू होणार असल्याचे शुक्रवारी राजभवनातून जाहीर करण्यात आले. राज्यपालांनी यासंदर्भात गुरूवारीच आदेश जारी केला आहे.
4 जुलैला विधानसभेचे कामकाज सकाळी 11 वाजता, तर विधानपरिषदेचे कामकाज दुपारी 12 वाजता सुरू होईल. भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 174, खंड (1) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधानभवन नागपूर येथे अधिवेशन आयोजित करण्याच्या निर्णयास मान्यता दिली आहे.
28 मार्च रोजी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पावसाळी अधिवेशन 4 जुलैपासून सुरू होईल, असे जाहीर केले होते. मात्र, हे अधिवेशन कुठे होणार याचा कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता. प्रथेप्रमाणे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेतले जाते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचे निश्चित केले होते.
यापार्श्वभूमीवर गटनेत्यांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांची समिती नेमली होती. या समितीने अधिवेशन नागपूरला घेण्याबाबत काही बैठका घेतल्या. पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यास शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विरोध केला होता. प्रथेप्रमाणे पावसाळी अधिवेशन मुंबईला झाले पाहिजे, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली होती. मात्र, शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचा निर्णय घेतला.