पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परदेश दौऱ्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगाम पावसाळी अधिवेशन 4 जुलै रोजीपासून नागपूरात सुरू होणार असू त्यापूर्वीच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. हा विस्तार शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणूकीनंतर करण्यात येऊ शकतो.
पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कृषी व फलोत्पादन खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी परदेशी जाण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविली आहे. याबाबत लवकरच अधिसूचना काढून अधिकृत घोषणा केली जाणार आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ नियुक्त्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केल्याचे वृत्त आहे. याला पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी होकार दर्शविला असून विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, रखडलेल्या महामंडळ नियुक्त्या आणि वरिष्ठ आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मार्गही मोकळा झाला आहे.