पालघर : प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांकडून आचारसंहिता भंग- काँग्रेस

मुंबई : पालघर लोकसभा क्षेत्रात भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभांमध्ये कर्ज माफ करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरला मेडिकल कॉलेज उभारू, वसई विरार महापालिका क्षेत्रातून २९ गावे वगळू, अशा घोषणा केल्या. मुख्यमंत्री हे आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत असून त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालघर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली.
दरम्यान, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार केली. या पोटनिवडणुकीत भाजपकडून सत्ता व पैशाचा प्रचंड गैरवापर सुरू असून पोलिस व महसूल अधिकारी यांचा वापर प्रचारासाठी केला जात आहे.
मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचारात पक्षाच्या जाहीरनाम्यातील मुद्दे मांडले असून त्यामुळे आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग झाला नसल्याचे भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.