पालकमंत्री गिरीश बापट यांच्यामुळंच पुण्यात पाणीकपात – रमेश बागवे

पुणे – चौकीदाराच्या चुकीच्या नियोजनामुळेच पुण्यावर पाणी कपातीचे संकट ओढावले असून लोकसभेच्या मतदानानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार असल्याचा दावा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी शुक्रवारी केला.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांनी मतदानानंतर शहरात अधिकची पाणी कपात केली जाणार की नाही, याबाबत स्पष्ट भूमिका तत्काळ मांडावी, असे आवाहनही त्यांनी बापट यांना दिले. दरम्यान, ‘पुण्याच्या ‘चौकीदारा’वर असलेले आरोप पाहता हा चौकीदार चोरच आहे,’ अशी टीका बागवे यांनी बापट यांचे नाव न घेता या वेळी केली.
बागवे यांनी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत बापट यांच्यावर टीका केली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, आरपीआय कवाडे गटाचे प्रकाश भालेराव, आरपीआय गवई गटाचे बबनराव अडसूळ, दलित पँथरचे प्रकाश साळवे, आंबेडकरवादी गटाचे विठ्ठल गायकवाड, ‘रिपाईं’चे महंमदभाई शेख, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अखिल दोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख किरण कद्रे आदी उपस्थित होते. पुण्यात सध्या दिवसातून एकवेळ पाणी पुरवठा करण्यात येत असून तो अत्यंत तोकडा आहे. शहराच्या अनेक भागांत पाणी मिळत नसून ही वेळ केवळ चुकीच्या नियोजनामुळे आल्याचे बागवे म्हणाले. पुण्यात २३ एप्रिलला; तर शिरूर मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांनी मतदानानंतरची संभावित पाणीकपातीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी टीका बागवे यांनी केली.