पार्थ पवार यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन; अपघातग्रस्त तरुणाला दिला मदतीचा हात!

उरण, (महा-ई-न्यूज)। रणरणत्या उन्हात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर आता शिगेला पोहोचला आहे. प्रचाराचा रणधुमाळी आणि लगबग सुरू असतानाच राष्ट्रवादी-काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी आपल्या उरण दौर्यादरम्यान ट्रक-दुचाकीच्या अपघातात अत्यंत गंभीर झालेल्या तरुणाला तात्काळ मदत उपलब्ध करुन दिली. त्यामुळे संबंधित तरुणाला वैद्यकीय मदत वेळेत मिळू शकली.
न्हावा (ता. उरण) येथे सोमवारी सुमारे एक वाजताच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, संबंधित तरुणाचे दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती. अपघात घडल्याचे समजताच याठिकाणी वाटसरुंनी घोळका केला होता. इतक्यात पार्थ पवार यांचा ताफा याच मार्गावरुन जात होता. पुढच्या कार्यक्रमाला वेळेत पोहोचण्याची अगदी घाई सुरू होती. मात्र, अपघात झाल्याचे लक्षात येताच पार्थ पवार यांनी आपला ताफा थांबवला. गाडीतून बाहेर येत जखमी तरुणाच्या दिशेने धाव घेतली. त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आपल्या ताफ्यातील पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने ताफ्यातीलच एका वाहनातून संबंधित तरुणाला रुग्णालयात तात्काळ पोहोचवण्याची व्यवस्था केली. पोलीस कर्मचार्यांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघात झाल्यानंतर काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यास मदत करीत पार्थ पवार यांनी नियोजित कार्यक्रमाला रवाना होण्याच्या सूचना आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या. त्यानंतर ताफा पुढील कार्यक्रमस्थळी रवाना झाला.
—
सहृदयी पार्थ पवारांचे परिसरात कौतुक…
प्रचार आणि निवडणुका होत राहतील, पण पार्थ पवार यांनी सोमवारी माणुसकीचे दर्शन घडवले. निवडणुका होईपर्यंत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी-सभा, बैठकाचा अक्षरश: धुरळा होत आहे. मात्र, लोकप्रतिनिधीच्या संवेदनशीतेची खरी परीक्षा अशा काही दुर्घटनांमध्ये पहायला मिळते. भर उन्हात तडफडत पडलेल्या जखमी तरुणाला मदतीचा हात देवून पार्थ पवार यांनी तरुणांसमोर आदर्श घडवला आहे. उमेदवारी अर्ज भरताना प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीरंग बारणे भेटल्यावर त्यांना स्मीत हास्य करीत हस्तांदोलन करणारे पार्थ पवार, त्यानंतर जखमी तरुणाला ताफा रोखून मदत करणारे पार्थ पवार यांच्या सहृदयीपणाचे तरुणांमध्ये कौतुक होत आहे.