ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाण्यासाठी 45 डिग्रीच्या उन्हात शेतकऱ्यांचं 6 दिवसांपासून आंदोलन

सोलापूर : पाण्यासाठी 45 डिग्रीच्या रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांचं गेल्या 6 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यातली आष्टी उपसा सिंचन योजना पूर्ण होईपर्यंत उजनी धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र पाणी मिळत नसल्याने पाण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे थेट सिंचन योजनेसाठी खोदलेल्या कालव्याच्या खड्ड्यात बसून शेतकऱ्यांचं उपोषण सुरु आहे.

जनहित शेतकरी संघटनेनेही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत शेतकरी आक्रमक झाले आहेत.

21 वर्षांपूर्वी तत्कालीन युती सरकारच्या काळात आष्टी उपसा सिंचन योजना मंजूर झाली. चार वेळा आघाडी सरकारचा कालावधी लोटला. राज्यात सत्तांतर झालं. पुन्हा युतीचं सरकार राज्यात सत्तारूढ झालं. नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या पदरात आश्वासनाच्या पलीकडे काहीच पडलं नाही. आता पाणी मिळेपर्यंत मागे हटायचं नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

नवीन सरकार आल्यानंतर तरी ही योजना पूर्ण होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र अडीच वर्ष होऊनही या सरकारने या योजनेकडे लक्ष न दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे मंत्र्यांनी अद्याप फिरकूनही न पाहिल्यामुळे शेतकऱ्यांचा रोष आणखी वाढला आहे.

कालव्याच्या खड्ड्यात बसून पाच दिवस झाले तरी सरकारच्या कोणाही प्रतिनिधीला आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकायला वेळ मिळाला नाही. जिल्ह्यातले दोन्हीही मंत्री सोलापुरात आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेही सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनीही शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेण्याची तसदी घेतलेली नाही.

फेब्रुवारी महिन्यातच पाणी सोडण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं होतं. जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन पाणी देण्यास टाळाटाळ करत असल्याने अखेर शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करलाय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button