breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पाणीसमस्या’ मुक्‍त भोसरीसाठी कामाला लागा!

– आमदार महेश लांडगे यांनी खडसावले
– अधिकारी-नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघातील पाणीसमस्या निकालात निघाली पाहिजे. आगामी काळात “पाणीसमस्या’ मुक्‍त भोसरी व्हावी. यासाठी प्रभावी उपाययोजना करा आणि कारणे न देता कामाला लागावे. तसेच, नागरी समस्यांबाबत संबंधित प्रभागातील नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावे, अशा शब्दांत आमदार महेश लांडगे यांनी खडसावले आहे.
पावसाळापूर्व कामे, नालेसफाई, उद्यान, रस्ते आणि आरोग्य अशा विविध नागरी समस्यांबाबत ई-प्रभाग कार्यालयांतर्गत नगसेवक आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी दुपारी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार लांडगे यांनी अधिकारी-नगरसेवकांना सूचना केल्या आहेत.
यावेळी महापौर नितीन काळजे, क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा सभापती सागर गवळी, नगरसेवक वसंत बोऱ्हाडे, विकास डोळस, राजेंद्र लांडगे, निर्मला लांडगे, सोनाली गव्हाणे, ऍड. नितीन लांडगे, भीमाताई फुगे, चेतन घुले, लक्ष्मण उंडे, सारिका बोऱ्हाडे, नितीन बोऱ्हाडे यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, नगरसेवकांनी सूचवलेली विधायक कामे अधिकाऱ्यांनी तात्काळ हाती घेतली पाहिजेत. विकासकामांचा प्राधान्यक्रम लावून कामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध नियोजन करायला हवे. आपआपल्या प्रभागातील आरक्षणे ताब्यात घेवून त्यांचा विकास करण्याच्या कामाला गती द्यावी. नागरी आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता दोन दिवसांच्या अंतराने आपल्या प्रभागात धूर फवारणी करुन घ्यावी. ड्रेनेजलाईनची सफाई करुन पावसाळापूर्व कामे आठ दिवसांत संपवावी. यासह कचरा संकलन व्यवस्था, उद्यानांमधील समस्या, पथदिवे, रस्ते दुरूस्ती अशा कामांची यादी तयार करुन प्राधान्यक्रमाने कामे मार्गी लावली पाहिजेत, अशा सूचनाही आमदार लांडगे यांनी दिल्या.
———–
पाणीपुरवठ्यात पक्षपातीपणा नको…
भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांमध्ये पाणीसमस्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्याबाबत अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांनी समन्वय करून तात्काळ कार्यवाही केली पाहिजे. “समान पाणीपुरवठा’ या नियमानेच अधिकाऱ्यांनी काम करावे. पाणी पुरवठ्याबाबत पक्षपातीपणा खपवून घेतला जाणार नाही. पाणी पुरवठ्याच्या सर्व वाहिन्या “वॉश आउट’ करुन घ्याव्या. तसेच, कुठेही पाणी कमी प्रमाणात मिळणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच, पावसाळ्यात संभाव्य दुर्घटनेचा विचार करून प्रत्येक प्रभागात काम करणारी “टीम’ नागरिकांसाठी 24/7 स्वरुपात कार्यरत करावी, असे आदेश आमदार महेश लांडगे यांनी संबंधित नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button