पाच मिनिटे बोलून दाखवा; राहुल गांधींचं मोदींना आव्हान
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या धडाडू लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील संघर्षामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे आता अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांना हातात कागद न घेता १५ मिनिटे बोलण्याचे आणि भाषणात ५ वेळा विश्वेश्वरय्या बोलण्याचे आव्हान नरेंद्र मोदी यांनी दिले. यावर आता राहुल गांधी यांनीही मोदींवर पलटवार केला आहे. राहुल यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केवळ ५ मिनिटे बोलण्याचे आव्हान दिले आहे.
या ट्विटमध्ये राहुल गांधींनी म्हटले आहे की, प्रिय मोदीजी आपण बोलता तर खूप. पण, आपले शब्द आणि आपले काम यांचा मेळ बसत नाही. तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून मोदींवर प्रश्नांची बरसात करण्यात आली आहे.
राहुल यांनी विचारले आहे की, ‘मोदीजी, तुम्ही रेड्डी ब्रदर्स गँगला ८ तिकिटे दिलीत. त्यावर ५ मिनीटे बोलू शकाल?’, येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्याबाबतही राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.