पाक मधील चीनी दुतावासात चीनी अभियंत्याचा मृत्यू

इस्लामाबाद – पाकिस्तानात कार्यरत असलेल्या एका चीनी अभियंत्याचा तेथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. पाकिस्तान मधील चीनी दुतावासाच्या आवारातच तो मरण पावल्याचे सांगण्यात येते. तो ज्या खोलीत वास्तव्याला होता तेथेच तो मरण पावला परंतु बारा दिवस त्याची कोणालाच माहिती मिळाली नाही.
अखेर त्याच्या खोलीतून उग्र दर्प येऊ लागल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी ही खोली उघडली असता त्यांना हा अभियंता मरण पावलेल्या अवस्थेत आढळून आला. हा अभियंता 28 ते 29 वयोगटातील आहे. त्याच्या मृत्युचे नेमके कारण शोधले जात असले तरी अधिकाऱ्यांना मात्र हा मृत्यू नैसर्गिकच वाटतो आहे कारण तो रक्तदाबाचा पेशंट होता त्यातूनच त्याचा मृत्यू झाला असावा असे काहींचे म्हणणे आहे.
चीन- पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये सुरू असलेल्या विविध प्रकल्पांमध्ये अनेक चीनी तंत्रज्ञ आणि कामगार काम करीत आहेत. या चीनी नागरीकांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी लष्कराने लष्कराची एक विशेष तुकडी तैनात केली आहे. त्यात हजारो जवानांचा समावेश आहे. तरीही अनेक चीनी नागरीकांना तेथील दहशतवाद्यांनी ठार मारले आहे. मात्र या अभियंत्यांच्या मृत्यू मागे घातपात असावा किंवा कसे या विषयी चीनी दूतावासाने कोणताहीं खुलासा केलेला नाहीं.