पाकिस्तान म्हणतो, भारताशी युद्धाची कुठलीही शक्यता नाही

इस्लामाबाद – भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत. त्यामुळे दोन्ही देशांत युद्धाची कुठलीही शक्यता नसल्याचे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.
पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल असिफ गफूूर यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांच्या देशाच्या सुज्ञपणाचा आणि समजंसपणाचा आव आणतानाच भारताला इशाराही दिला. मुत्सद्देगिरीला अपयश येते तेव्हा युद्ध घडते. भविष्यात कुठे जायचे हे भारताने समजून घ्यावे. शांतता प्रस्थापित करण्याची आमची इच्छा आहे. मात्र, त्याला आमची कमजोरी समजू नये. चर्चेतून भारतच बाहेर पडला, असे ते म्हणाले. पाकिस्तानच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे गफूर यांनी शस्त्रसंधी भंगावरून उलट्या बोंबा मारल्या.
भारताबरोबरच्या शस्त्रसंधी कराराचा आदर करण्याची पाकिस्तानची इच्छा आहे. मात्र, चालू वर्षात आतापर्यंत भारताने तब्बल 1 हजार 77 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला. भारताने पहिली गोळी झाडली अन् कुठले नुकसान झाले नाही तर आम्ही प्रत्युत्तर देणार नाही. मात्र, भारताने दुसरी गोळी झाडल्यास आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, अशी दर्पोक्ती त्यांनी केली.
भारतीय सुरक्षा दलांनी रविवारी शस्त्रसंधीचा भंग करून आमच्या नागरी भागांवर मारा केला. त्यामध्ये आमचे 2 नागरिक मृत्युमुखी पडले, तर 24 जखमी झाले, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. खरेतर, पाकिस्तानी सैनिकांकडून वारंवार शस्त्रसंधीचा भंग केला जातो. पाकिस्तानी सैनिक सातत्याने भारतीय सुरक्षा नाक्यांना आणि नागरी भागांना लक्ष्य करतात. त्या माऱ्याला केवळ प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. भारतीय प्रत्युत्तरात मोठी हानी झाल्यानंतर पाकिस्तानकडून उलटा कांगावा केला जातो.