पाकिस्तानी सैनिकांचा भारतीय हद्दीत मारा; महिला जखमी
श्रीनगर – पाकिस्तानी सैनिकांनी कुरापती काढण्याचे सत्र कायम ठेवत आज भारतीय हद्दीत मारा केला. त्यात एक महिला जखमी झाली. ही घटना जम्मू-काश्मीरच्या तंगधार क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत घडली. पाकिस्तानी सैनिकांनी गुरूवारी रात्रीपासून सुरू केलेला मारा शुक्रवारी सकाळपर्यंत सुरू होता. त्यांनी भारतीय ठाण्यांबरोबरच निवासी भागांनाही लक्ष्य केले. काही तोफगोळ्यांचा स्फोट निवासी भागांत झाला. त्यामध्ये नूूरजहॉं ही महिला जखमी झाली.
तिला उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पाकिस्तानी माऱ्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी सैनिक सातत्याने शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय हद्दीत मारा करतात. बऱ्याचदा दहशतवाद्यांना घुसखोरी करणे सुलभ व्हावे यासाठी पाकिस्तानी सैनिक ते कृत्य करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.