पाकिस्तानी कारस्थान-घूसखोरी करण्याच्या तयारीत 450 दहशतवादी

नवी दिल्ली – भारताबरोबर शांतिवार्ता करण्याची तयारे दाखवत असतानाच पकिस्तानने आपल्या नापाक हरकती चालूच “ठेवल्या आहेत. अमरनाथ यात्रेदरम्यान दहशत निर्माण करण्यसाठी आयएसआय भारतात दहशतवाद्यांची घूसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील 10 ठिकाणांहून 450 दहशतवादी घूसखोरी करण्यास सज्ज आहेत. या सर्वांन पकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने प्रशिक्षण दिलेले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील बोई, मदारपूर, फगोश आणि देवलिया येथे ही प्रशिक्षण केंद्रे आहेत. या प्रशिक्षित दहशतवाद्यांमध्ये सर्वाधिक दहशतवादी जैश ए मोहम्मद या संघटनेचे आहेत.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यात राजनाथ सिंह राज्यपाल एन एन व्होरा, मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. ईदनंतरही संघर्षविराम चालू ठेवायचा की नाही, याबाबत ते सल्लामसलत करणार आहेत. या दौऱ्यात राजनाथ सिंह अमरनाथ यात्रेसाठी करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेचीही समीक्षा करणार आहेत.