पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा नाही – सुषमा स्वराज

नवी दिल्ली : जोपर्यंत दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नाही असं पुन्हा एकदा केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारला चार वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पाकिस्तानशी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने नमती भूमिका घेतल्याचे वृत्त त्यांनी फेटाळले
“आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. पण चर्चा आणि दहशतवाद एकत्र जाऊ शकत नाही. आम्ही नेहमीच ही भूमिका घेतली आहे”, असे सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत पार पडत असलेल्या समुद्री चर्चेसंबंधी सुषमा स्वराज यांना यावेळी विचारण्यात आलं. भारत पाकिस्तानशी चर्चा करण्यासाठी नमती भूमिका घेत आहे का असे यावेळी विचारण्यात आले. गतवर्षी भारताने कुलभूषण जाधव यांच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानने घेतलेल्या आठमुठी भूमिकेमुळे चर्चा रद्द केली होती.
सुषमा स्वराज यांनी आपल्या मुलभूत धोरणात कोणताही बदल झाला नसल्याचे सांगितले आहे. “जेव्हा सीमारेषेवर तणाव असतो, जवान शहीद होत असतात तेव्हा आम्ही पाकिस्तानसोबत चर्चा करु शकत नाही. दहशतवादावर चर्चा होणे गरजेचे असल्याने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चर्चा करत असतात”, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले.