breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

पाकिस्तानमधील आत्मघाती हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू

संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे उपाध्यक्ष जखमी
कराची – पाकिस्तानच्या अशांत मानल्या जाणाऱ्या बलुचिस्तान प्रांतात आज आत्मघाती हल्लेखोराने बॉम्बस्फोट घडवला. त्यात 25 जण मृत्युमुखी पडले, तर 35 जखमी झाले. जखमींमध्ये पाकिस्तानी संसदेचे वरिष्ठ सभागृह असणाऱ्या सिनेटचे उपाध्यक्ष मौलाना अब्दुल गफूर हैदरी यांचाही समावेश आहे.
बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्‍वेट्टापासून 70 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मात्सुंग भागात हा आत्मघाती हल्ला झाला. हैदरी यांच्या ताफ्याला लक्ष्य करूनच हा हल्ला घडवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. नमाज पठण करून हैदरी मशिदीबाहेर पडल्यावर आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवला. त्यात हैदरी यांच्या कारचे प्रचंड नुकसान झाले. त्यांचा कारचालक त्यात मृत्युमुखी पडला. मात्र, स्फोट झाला त्यावेळी हैदरी कारमध्ये बसले नसल्याने बचावले. हैदरी हे जेयूआय-एफ पक्षाचे नेते आहेत. मृतांमध्ये त्यांच्या पक्षाच्याच बहुतांश कार्यकर्त्यांचा समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले. स्फोटात किरकोळ जखमी झालेल्या हैदरी यांना उपचारासाठी क्वेट्टामधील रुग्णालयात हलवण्यात आले. पाकिस्तान सरकारकडून या आत्मघाती हल्ल्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान, कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button