पाकच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर द्या – केंद्रीय गृहमंत्र्यांचे आदेश

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. या पाक कारवायांवरून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. शेजारी देशाला शांतता नकोय. त्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर द्या, असे आदेशच त्यांनी सीमा सुरक्षा दलाला दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. मंगळवारी पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात आठ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. तसंच सोमवारी गोळीबारात जखमी झालेल्या महिलेचा आज मृत्यू झाला. पाकिस्तानच्या या नापाक कारवायांवर भारतानं संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बीएसएफच्या एका कार्यक्रमात पाकिस्तानला थेट इशाराच दिला.
आपल्या शेजारी देशाला शांतता नांदावी, असे वाटत नाही. पहिल्यांदा आपल्याकडून गोळीबार नको, पण समोरून गोळीबार झाल्यास जोरदार प्रत्युत्तर द्या. समोरून गोळीबार झाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर कसे द्यायचे हे आपल्या जवानांना चांगलेच माहिती आहे. आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर द्या. त्याबाबत जवानांना कुणीही विचारणा करणार नाही, असे राजनाथ म्हणाले.
दरम्यान, बीएसएफने पाकिस्तानी बंकर उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. बीएसएफ जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमुळं पाकिस्तानी सैन्य घाबरले होते. गोळीबार करू नका अशी विनवणी त्यांनी केली होती. पण दुसरीकडे पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच आहेत.