breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पहिल्या टप्प्यात सात लोकसभेतून 116 उमेदवार रिंगणात, 11 तारखेला मतदान

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. राजकीय पक्षांना आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच प्रचार करता येणार आहे. महाराष्ट्रात एकूण ७ लोकसभा मतदार संघामध्ये पहिल्या टप्प्यात ११ तारखेला मतदान होईल. यामध्ये एकूण ११६ मतदार रिंगणात आहेत. यात नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, नाना पटोले, भावना गवळी, हंसराज अहिर अशा दिग्गजांचे भवितव्याचा फैसला गुरुवारी होणार आहे.

महाराष्ट्रात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचीरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ या मतदार संघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. वर्ध्यामध्ये भाजपचे रामदास तडस तर काँग्रेसकडून चारुलता टोकस निवडणूक लढवत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे धनराज वंजारी आणि बसप कडून शैलेषकुमार अग्रवाल निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मात्र या मतदार संघात तिरंगी लढत होणार असून वंचित बहुजन आघाडीमुळे चुरस निर्माण झाली आहे.

रामटेक मतदार संघातून काँग्रेसने किशोर गजभिये आणि शिवसनेने कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. बसपचे सुभाष गजभिये आणि वंचित बहुजन आघाडीकडून किरण रोडगे पाटणकर मैदानात आहेत. या मतदारसंघात विद्यमान खासदार तुमाने यांच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष आहे. आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

नागपूर मतदार संघातून काँग्रेसचे नाना पटोले, भाजपचे नितीन गडकरी आणि बहुजन समाज पक्षाचे मोहम्मद जमाल निवडणूक लढवत आहेत. तर बहुजन रिपब्लिकन पक्षाचे डॉ. सुरेश मानेही रिंगणात आहेत. या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. नागपूर हे संघाचे मुख्यालय असल्यामुळे गडकरींसाठी ही लढाई प्रतिष्ठेची आहे. पटोले आणि गडकरी यांच्यात काँटेकी टक्कर होणार आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे आंबेडकरी आणि मुस्लिम मतदार मोहम्मद जमाल यांच्याकडे गेला तर पटोले यांना फटका बसू शकतो.

भंडारा गोंदिया मतदार संघातून राष्ट्रवादीने नाना पंचबुद्धे यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर सुनील मेंढे भाजपच्या तिकिटावर लढत आहेत. बसपने डॉ. विजया नंदुरकर यांना मैदानात उतरवले आहे. वंचित बहुजन आघाडीचे के. एन. न्हाणे निवडणूक लढवत आहेत. या मतदार संघात २०१४ मध्ये पटोले हे भाजपकडून निवडून आले होते. त्यानंतर वर्षभरापूर्वी पटोले यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा पटकावली होती. या मतदारसंघात तिरंगी निवडणूक रंगणार आहे.

गडचिरोली-चिमूर मतदार संघातून सर्वात कमी म्हणजे केवळ ५ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने अशोक नेते यांना उमेदवारी दिली आहे. तर, डॉ. नामदेव उसेंडी काँग्रेसच्या तिकीटावर मैदानत आहेत. बसपने हरीचंद्र मन्गम यांना रिंगणात उतरवले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून डॉ.रमेश गजबे हे मैदानात उतरले आहे. या मतदार भाजपते नेते आणि काँग्रेसचे उसेंडी यांच्यात लढत होणार आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचे हंसराज अहीर निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसकडून बंडूभाऊ म्हणजेच सुरेश धानोरकर रिंगणात आहेत. बहुजन समाज पक्षाने सुशिल वासनिक यांना मैदानात उतरवले आहे. अहीर विरुध्द काँग्रेसचे धारोरकर यांच्यात लढत होणार आहे. अहीर हे केंद्रात मंत्रीमंडळात होते. विदर्भातील महत्वाचे नेते मानले जातात. यामुळे अहीर यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची होती.

यवतमाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे माणिकराव ठाकरे मैदानात आहेत. तर, शिवसेनेच्या भावना गवळी निवडणूक लढत आहेत. बसपने अरुण किन्वटकर यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रविण पवारही निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात शिवसेनेच्या गवळी यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. भाजपाचे बंडखोर बी.पी. आडे यांच्यामुळे गवळी यांची डोकेदुखी वाढली आहे. या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत रंगणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button