पहिल्या टप्प्यात जेडीएसचे नऊ मंत्री असतील – कुमारस्वामी

बंगळुरू – कर्नाटक मंत्रिमंडळाच्या विस्तारातील पहिल्या टप्प्यात जेडीएस म्हणजेच धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नऊ मंत्री समाविष्ट करून घेतले जाणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी दिली. रिक्त राहिलेल्या दोन ते तीन जागा नंतर भरल्या जाणार आहेत.
मंत्रिमंडळ रचनेबाबत पक्षातील आमदारांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मंत्र्यांच्या नियुक्तीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष एच. डी देवेगौडा यांना देण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले. आजच आमच्या आमदारांची बैठक पक्षाध्यक्ष देवेगोैडा यांच्या उपस्थितीत झाली यावेळी पक्षाच्या आमदारांनी उत्तम प्रशासन देण्यासाठी सरकारला सहकार्य देण्याचे आवाहन केले आहे त्याला आमदारांनी विधायक प्रतिसाद दिला आहे असे ते म्हणाले.
कॉंग्रेस व जेडीएस पक्षांच्या समझोत्यानुसार कॉंग्रेसला 22 जागा आणि जेडीएसला 12 जागा मंत्रिमंडळात देण्यात आल्या आहेत. आघाडीचे सरकार नीट चालावे यासाठी दोन्ही पक्षांची एक समन्वय समिती आणि एक मॉनिटरींग समिती स्थापन केली जाणार आहे. उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे पण कॉंग्रेसची यादी मात्र अजून जाहीर झालेली नाही.